For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुन्हेगारी पार्श्वभूमी, धनाचाही आहे बोलबाला

06:22 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुन्हेगारी पार्श्वभूमी  धनाचाही आहे बोलबाला
Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्यातील मतदानाला आता केवळ चार दिवसांचा अवधी राहिला आहे. देशाच्या 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 मतदारसंघात हे मतदान होणार आहे. सर्व मतदारसंघातील संग्रामांचे चित्र अर्थातच स्पष्ट झालेले आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाचा उमेदवार मी आणि माझाच पक्ष कसा सत्तेवर येण्यासाठी सर्वात योग्य आहे, हे मतदारांना पटवून देण्यात मग्न आहे. अनेक आश्वासनांची मुसळधार वृष्टी मतदारांवर केली जात आहे. प्रचारांच्या सभांचा धडाका लागला आहे. या सर्व गलक्यात एका बाबीकडे सुजाण मतदारांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. ही बाब म्हणजे उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी. नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला आपली आणि आपल्या निकटच्या कुटुंबियांची मालमत्ता जशी उमेदवारी अर्ज सादर करताना घोषित करावी लागले, तशी स्वत:ची गुन्हेगारी पार्श्वभूमीही उघड करावी लागते. गुन्हेगारी आणि राजकारण यांचे नाते आता मतदारांच्या अंगवळणी पडले असले, तरी महत्वाची बाब अशी की दिवसेंदिवस हे नाते अधिक घट्ट आणि परस्परावलंबी होत चालले आहे. गुन्हेगारांना राजकारण्यांचे संरक्षण ही बाब फार पूर्वीपासून, खरे तर भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच उघड झाली होती. पण गेल्या तीन दशकांमध्ये राजकारणाचेच गुन्हेगारीकरण होते ते काय ही चिंता अनेकांना भेडसावू लागली आहे. आजच्या या पृष्ठात प्रथम टप्प्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच या टप्प्यातील काही महत्वाचे उमेदवार आणि मतदारसंघ, तसेच इतर काही सदरे आहेतच...

Advertisement

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवार संख्येत वाढ

? असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्मस् (एडीआर) या संस्थेने आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्यातील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व्यापक विश्लेषण करुन अहवाल सादर केला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून त्या मतदारांनी लक्षात घेण्यासारख्या आहेत.

Advertisement

? ही माहिती उमेदवारांनी स्वत: सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधूनच घेण्यात आली आहे. अनेक उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. केवळ राजकीय स्वरुपाच्या गुन्ह्यांची नव्हे, तर अपहरण, हत्या अशा गुन्ह्यांची नोंद असलेलेही अनेक उमेदवार दिसून येतात. महत्वाच्या सर्व पक्षांमध्ये असे उमेदवार असलेले दिसतात.

निवडून येण्याची क्षमता 

? राजकारणात ‘जिंकून येण्याची क्षमता’ हा सर्वात महत्वाच्या व्यवहारी निकष उमेदवारची निवड करताना मानण्यात येतो. मतदारांना असे उमेदवार चालत असतील तर राजकीय पक्षांचाही नाईलाज असतो, असे कारण दिले जाते. अनेक बाहुबली उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झालेले प्रत्येक निवडणुकीत दिसतात.

? गुन्हेगारी पार्श्वभूमीचा राजकारणात बोलबाला होण्याचा मतदारही बऱ्याच प्रमाणात कारणीभूत असतात हे कटु सत्य आहे. कारण, उमेदवारांचे निर्धारण जरी राजकीय पक्ष करीत असले, तरी अंतिमत: कोणाला निवडून द्यायचे, हे मतदारांच्याच हाती असते. ते कित्येकदा गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेत नाहीत.

अहवाल काय सांगतो...

? प्रथम टप्प्यातील 102 मतदारसंघांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून 1 हजार 625 उमेदवार आहेत. त्यांच्यापैकी 1,618 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्यापैकी 16 टक्के, अर्थात 252 उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरुपाच्या तक्रारी सादर आहेत, असे दिसून आलेले आहे.

? या 252 उमेदवारांपैकी 161, अर्थात एकंदर उमेदवारांपैकी 10 टक्क्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. 7 उमेदवारांवर हत्या केल्याचे, तर 19 उमेदवारांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. 18 उमेदवारांनी त्यांच्या विरोधात महिलांशी संबंधित गुन्हे केल्याचे आरोप आहेत. एकावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

? 35 उमेदवारांवर तेढ निर्माण करणारी भाषणे केल्याचा आरोप आहे. त्यांच्यात विविध समाजघटकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करणे, जात, धर्म यांच्यावरुन पक्षपात करणे आदी गुन्हे आहेत. मात्र, या प्रकारात मोडणारे गुन्हे काहीवेळा राजकीय स्पर्धेतून नोंद केले जातात, असेही या संदर्भात काही तज्ञांचे मत आहे.

राजकारण झालाय श्रीमंतांचा खेळ

? कायद्यानुसार निकष पूर्ण करणारी कोणतही व्यक्ती निवडणुकीत उमेदवार म्हणून भाग घेऊ शकते. तथापि, निवडणूक जिंकण्याचे सोडा, पण ती लढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. निवडणुका हा श्रीमंतांचा खेळ आहे, अशी सर्वसामान्यांची भावना खरीच आहे. धनवानच निवडणुकीसाठी समर्थ असतो.

? प्रथम टप्प्यातील 102 उमेदवारांपैकी 28 टक्के उमेदवार कोट्याधीश आहेत. त्यांची आणि त्यांच्या निकटच्या कुटुंबियांची मालमत्ता 1 कोटी पेक्षा अधिक आहे. या टप्प्यातील सर्व उमेदवारांची सरासरी मालमत्ता 4.51 कोटी रुपये आहे. सर्व पक्षांमध्ये अतिश्रीमंत उमेदवार आहेत. डावे पक्षही याला अपवाद नसल्याचे दिसते.

नकुलनाथ सर्वात श्रीमंत

? मध्यप्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून उमेदवार असलेले काँग्रेसचे नकुलनाथ हे या टप्प्यातील सर्वात श्रीमंत असल्याचे दिसून येते. त्यांनी 716 कोटी रुपयांची  स्थावर आणि जंगम मालमत्ता घोषित केली आहे. काँग्रेसचे 49 उमेदवार कोट्याधीश असून या पक्षाच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती 27.79 कोटी आहे.

? भारतीय जनता पक्षाच्या 77 उमेदवारांपैकी 69 कोट्याधीश असून या पक्षाच्या सर्व उमेदवारांची सरासरी स्थावर आणि जंगम मालमत्ता 22.38 कोटी रुपये आहे. या पक्षाच्या उमेदवारांमध्ये उद्योगपती आणि गर्भश्रीमंतांचाही समावेश असल्याचे दिसून येते. दोन उमेदवारांची संपत्ती 100 कोटी रुपयांहून अधिक आहे.

? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 3 उमेदवार कोट्याधीश आहेत. तर द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे 22 पैकी 21 उमेदवार कोट्याधीश आहेत. अण्णाद्रमुकचे 36 पैकी 35 उमेदवार कोट्याधीश असून बहुजन समाज पक्षाचे 18, अपक्षांपैकी 124, तर एकंदर 450 उमेदवार कोट्याधीश असल्याचे दिसून येते.

Advertisement
Tags :

.