परिक्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत क्राईम रेट घटला
सांगली :
कोल्हापूर परिक्षेत्रात सन 2023 च्या तुलनेत सन 2024 मध्ये क्राईम रेट घटला आहे. तसेच या कालावधीत पोलिसांवर मोठा ताण होता. कारण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यातच अनेक व्हीआयपींचे बंदोबस्त होते. तरीसुध्दा पोलिसांचे काम सुंदर झाले आहे आणि हे ऑन रेकॉर्ड दिसून येते. पण काही बाबतीत मात्र पोलिसांनी अजून काम करण्याची गरज आहे. ड्रग्जच्या बाबतीत पोलिसांबरोबरीने इतर विभागांनीही साथ दिल्यास यामध्ये निश्चित चांगले रिझल्ट दिसून येतील, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
सुनील फुलारी हे चार दिवसापासून जिल्ह्यातील पोलीस ठाण्याची तपासणीसाठी आले होते. त्यांचा हा दौरा आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी उहापोह केला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, पोलीस निरिक्षक सतीश शिंदे उपस्थित होते.
महिलांवर अत्याचाराच्या घटनेमध्ये त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे या लहान मुलींवर तसेच महिलांवर अन्याय करणारी व्यक्ती ही परिचित आहे. किंवा त्यांच्या नात्यातीलच आहे. त्यामुळे अशा गोष्टी कशा रोखता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अपरिचिताकडून अन्याय झालेल्या घटना अल्प आहेत. पण परिचितांकडून घडलेल्या घटना या 90 टक्के असल्याचे सांगितले.
करजगी येथील झालेल्या प्रकारात यापुर्वी जर त्या गुन्हेगारांला पहिल्या गुन्ह्यात शिक्षा झाली असती तर त्याच्याकडून दुसरा गुन्हा घडला नसता. पहिल्या गुन्ह्यात त्यांने त्यावेळी असणाऱ्या फिर्यादीबरोबर कॉम्प्रोपाईज केल्याने तो सुटला आणि त्यानंतर ही घटना घडल्याचे सांगितले. त्यामुळे अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर आमचे आता यापुढील काळात विशेष लक्ष असणार.
- ड्रग्ज बाबतीत अन्न औषधकडुन साथ गरजेची
सध्या ज्या नशेच्या गोळ्या किंवा एमडी ड्रग्जबाबतीत मोठयाप्रमाणात पोलिसांना टार्गेट केले जाते. त्यावर ते म्हणाले की ज्या अवैध ड्रग्जची निर्मिती आहे. त्याच्यावर घाला घालण्याचे काम पोलीस यंत्रणा निश्चित करते पण ज्या नशेच्या अधिकृत गोळ्या आहेत. त्याच्या विक्रीवर बंधने आणण्याचे काम अन्न औषध प्रशासनाकडून करण्याची गरज आहे. त्यावर जर योग्य कारवाई झाली तरच यापुढील काळात या नशेच्या गोळ्या अल्पवयीन किंवा नशेबाजांच्या हातात येणार नाहीत.
- अपघाताचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक
सांगली जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात हायवेचे जाळे पसरले आहे त्यामध्ये नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे आहेत. पण या दोन्ही हायवेपेक्षा ग्रामीण भागात सिंगल रस्ते आहेत. त्यावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण निश्चित वाढले आहे. हे कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील यासाठी प्रयत्न करत आहोत.
- अल्पवयीनांचे काय करायचे हा खरोखरच गहन प्रश्न
सध्या अनेक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता हा खरोखरच गहन प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. याला कसे रोखायचे हा प्रश्न पोलीसांसमोर आहेच पण पालकांनीही यापुढील काळात आपला मुलगा काय करतो याची तपासणी करण्याची गरज आहे. जर तो समाजविघातक कृत्यामध्ये सहभागी होत असेल तर त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे जेणेकरून त्याला रोखता येईल.