For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Crime News: नशिल्या इंजेक्शनप्रकरणी दोघा संशयितांना अटक, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

11:02 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
crime news  नशिल्या इंजेक्शनप्रकरणी दोघा संशयितांना अटक  पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त
Advertisement

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या परिसरात सापळा लावला होता

Advertisement

कोल्हापूर : विक्रीस बंदी असणाऱ्या मेफेटरमाईन सल्फाईट या उत्तेजक द्रव्याची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून नशिल्या इंजेक्शनच्या 75 बाटल्या, दुचाकी, मोबाईल असा सुमारे 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मेडिकल व्यावसायिक तेजस उदयकुमार महाजन (वय 35, रा. शिवाजी पार्क), विवेक शिवाजी पाटील (वय 30, रा. माळीवाडी, उचगाव) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, नशिल्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी शाहूपुरीत दोघेजण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती.

Advertisement

यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या परिसरात सापळा लावला होता. पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरुन एक तरुण या चौकात आला. काही वेळातच दुसऱ्या तरुणाने आपल्याजवळील बॉक्स त्या तरुणाकडे दिला. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

मोपेडची तपासणी केली असता बॉक्समध्ये नशिल्या इंजेक्शनच्या ७५ बॉटल आढळून आल्या. पोलिसांनी दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार वैभव पाटील, राजेश राठोड, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, प्रदीप पाटील, शुभम संकपाळ, लखन पाटील, संतोष बरगे, विशाल खराडे, गजानन गुरव यांनी ही कारवाई केली.

हार विक्रेता, बॉडी बिल्डर ते इंजेक्शनची तस्करी

विवेक पाटील याचे उचगाव फाटा येथे हाराचे दुकान असून, त्याला बॉडी बिल्डींगचा छंद आहे. यातूनच तो विविध जिममध्ये जात होता. याच ठिकाणी त्याला मेफेटरमाईन या इंजेक्शनची माहिती मिळाली होती. हारांची विक्री करत तो विविध जिममधील तरुणांना या इंजेक्शनची विक्री करत होता.

५०० रुपयांना विक्री

तेजस महाजन याचे कदमवाडी परिसरात महाजन मेडिकल नावाचे दुकान आहे. तेजस मुंबई येथून मेफेटरमाईन सल्फाईट या इंजेक्शनची खरेदी करत होता. २७० रुपयांना खरेदी करुन ४०० रुपयांना त्याची विक्री विवेकला करत होता. विवेक हेच इंजेक्शन ५०० ते ६०० रुपयांना विकत होता

काय आहे मेफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन

या इंजेक्शनचा वापर एखाद्या रुग्णाचा रक्तदाब कमी झाल्यानंतर तो वाढविण्यासाठी केला जातो. शस्त्रक्रियेदरम्यान रक्तदाब कमी होऊ नये यासाठी याचा वापर करण्यात येतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गोल्डर मिनिट्समध्ये सीआरपी करतानाही याचा वापर केला जातो. अनेक देशांमध्ये या इंजेक्शनवर बंदी आहे. काही देशांमध्ये जनावरांवर उपचारासाठी याचा वापर केला जातो.

३० मिलीची एक बॉटल

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ३० इंजेक्शनच्या बॉटल मिलीच्या आहेत. एका बॉटलमध्ये साधारणपणे ३ मिलीची १० इंजेक्शन घेतली जातात. तर काहीजण जास्त प्रमाणात नशेसाठी याचा वापर करतात.

Advertisement
Tags :

.