Crime News: अडीच लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
खेड-कुरवळ गावठाण येथील घटना, अज्ञात चोरट्यावर गुन्हा
खेड: तालुक्यातील कुरवळ गावठाण येथे दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करत पोटमाळ्यावर ठेवलेल्या पत्र्याच्या पेटाऱ्यातून 2 लाख 30 हजार 130 रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. शुक्रवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हरिश्चंद्र बापू उतेकर (50, रा. कुरवळ गावठाण) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ही घटना 1 ते 2 डिसेंबर या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. चोरट्याने पेटाऱ्यातून 1 लाख 19 हजार 372 रुपये किंमतीचा 18 ग्रॅम 940 मि.मी. वजनाचा हार, 94 हजार 126 रुपये किंमतीची दोन मंगळसूत्र, 8 हजार 632 रुपये किंमतीची एक बाळी, 8 हजार रुपये किंमतीची साखळी असा ऐवज लंपास केला.
घरी आल्यावर दरवाजाची कडी तोडून चोरट्याने दागिन्यांवर डल्ला मारल्याचे निदर्शनास येताच हरिश्चंद्र उतेकर यांना धक्काच बसला. त्यांनी पोलीस ठाणे गाठत रितसर तक्रार नोंदवली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अज्ञात चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.