कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यातील गुन्हेगारी : गोमंतकीय की बिगरगोमंतकीय?

06:46 AM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोव्याचा विकास हा जेवढ्या कौतुकाचा विषय आहे, तेवढीच गोव्यातील गुन्हेगारी ही देखिल चिंताजनक बाब आहे. ज्या पर्यटनामुळे गोव्याचे नाव सतत राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक पातळीवरही प्रकाशझोतात होते, तेच पर्यटनक्षेत्रही आता या गुन्हेगारीमुळे बदनाम झालेले आहे. गोव्याच्या कोणत्या क्षेत्रात गुन्हेगारी नाही? गोव्यातील गुन्हेगारी ही गोमंतकीय किती अन् बिगरगोमंतकीय किती?

Advertisement

गोव्याला लागलेल्या गुन्हेगारीच्या कलंकाची व्याप्ती वाढतच आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन, पोलीस अशा बहुतांश क्षेत्रांमध्ये या ना त्या रुपाने गुन्हेगारी आहेच. एवढेच कशाला अगदी धर्मस्थळांवरही गुन्हेगारी होत असून त्यांतही गोमंतकीय अन् बिगरगोमंतकीयत्व आहे. अलीकडे वाढलेल्या सायबर क्राईमध्येही बिगरगोमंतकीयांचा भरणा. अगदी बेटिंगसारखे प्रकार गोव्यात वारंवार घडत आहेत ते बिगरगोमंतकीयांकडूनच. कोट्यावधींची आर्थिक फसवणूक होत आहे ती बिगरगोमंतकीयाकडूनच. मात्र हे जे गुन्हे घडतात, त्यांना गोमंतकीयांचा थोडा तरी आधार मिळत असतोच, याकडेही दुर्लक्ष करुन चालत नाही.

Advertisement

गोव्यातील या गुन्हेगारीचा परिणाम असा झालाय की गोव्यात कितीही मोठा गुन्हा घडला तरी फार मोठा दीर्घकालीन परिणाम कुणावर होत नाही. ना जनतेवर ना सरकारवर! काही दिवस बातम्या येतात, चर्चा होते, मग सगळेजण सारे काही विसरुन जातात. फक्त दु:ख राहते, नुकसानी राहते ती केवळ जे गुन्हेगारीला बळी पडले त्यांची. बाकी कुणाला वेळ आहे म्हणा, कुणाच्या दु:खासाठी! तेही खरेच म्हणा, प्रत्येकाला स्वत:चा प्रपंच असतो. शेवटी जो भोगते त्यालाच कळतं, असे म्हणतात ते खरंच ना! मंगळवारी पहाटे गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. घाणेकर कुटुंबाच्या बंगल्यावर मोठा दरोडा पडला. बंगल्यातील कुटुंबियांची मुस्कटदाबी, मारहाण करुन हा दरोडा यशस्वी करुन 50 लाखांचा ऐवज पळविण्यात आला. या दरोड्याने गोव्यात पुन्हा एकदा खळबळ माजली. पण तिची तीव्रता किती दिवस राहणार? जनता, पोलीस, सरकार यापासून काय धडा घेणार? गुन्हेगारीच्या घटनांमागून घटना घडत आहेत, गोवा दिवसेंदिवस बदनाम होत आहे, अशावेळेला गोव्यातील गुन्हेगारीत केवळ 2 टक्केच गोमंतकीय गुंतलेले असतात, बाकीचे सर्वजण बिगरगोमंतकीय असतात, यातच समाधान मानून रहायचे काय?

कोणत्याही प्रदेशात विकास आला की त्यामागून त्याचे ‘साईड इफेक्ट’स् येतातच. त्यात गोवा म्हणजे एक महानगरच म्हणावे अशी परिस्थिती झाली आहे. विकासामुळे व पर्यटनामुळे गोव्यात ग्रामीण भाग हा तसा राहिलेला दिसत नाही. शहरातील बहुतांश गोष्टी गावोगावी पोहोचलेल्या आहेत. प्रगतीपथावर असलेल्या 16 लाख लोकसंख्येच्या गोव्यात सुमारे 8 लाख बिगरगोमंतकीय आहेत. सरकार सांगते त्यानुसार गोव्यात जे गुन्हे घडतात त्यात केवळ 2 टक्के गोमंतकीय गुंतलेले असतात, म्हणजेच उर्वरीत 98 टक्के हे या 8 लाखांमधील असतात का? नाही. या 98 टक्क्यांमध्ये मोजकेच बिगरगोमंतकीय असतात जे गोव्यात स्थायिक झालेले आहेत. मात्र बहुतांशजण हे प्रवासी बिगरगोमंकीय असतात. ते गोव्याबाहेरुन येतात, गोव्यात गुन्हा करतात आणि पुन्हा जातात... तेच प्रवासी गुन्हेगार. काही महिन्यांसाठी मजूर म्हणून येणारे आपसात भांडणे करुन एकमेकाचे जीव घेतात. रेल्वेमधील चोरटे हे बिगरगोमंतकीय असतात. व्याभिचारामुळे गोव्यात येऊन एखाद्याचा काटा काढण्याचीही प्रकरणे वारंवार घडतात. अशाप्रकारचे अनेक खून गोव्यात झालेले आहेत. विवाहबाह्या संबंधामुळे मुलांचे, नवऱ्यांचे, बायकांचे खून गोव्यात येऊन केले जातात. गोव्यात घडणाऱ्या गँगवॉरमध्ये बिगरगोमंतकीयांचा भरणा असतो. रात्रीच्यावेळी पोलिसांशी दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांमध्येही बिगरगोमंतकीयच अधिक असतात. गोव्यातील जमिनी बळकाव प्रकरणातही त्यांचीच मक्तेदारी आहे, त्यांना साथ देणारे गोमंतकीय आहेत.

‘कॅश फॉर जॉब’ यात बिगरगोमंतकीय नव्हते, तरीही प्रकरणाचा छडा लागलाच नाही. घरोघरी वस्तु विकण्याच्या निमित्ताने घरांची रेकी करुन चोऱ्या केल्या जातात, दरोडे टाकले जातात. दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने घरातील महिलांना मारहाण करुन दागिने घेऊन पळण्याचे प्रकार घडतात. वाटेवरुन जाणाऱ्या महिलांची मंगळसूत्रे हिसकावून नेण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. हॉटेलांमधील भाडणांमध्ये, खुनांमध्ये बिगरगोमंतकीय असतात. अल्पवयीन मुलींची अपहरणे ही बिगरगोमंतकीयांकडून  बिगरगोमंतकीयांची होतात. होम डिलीवरी देणारेही गुन्हे करतात. अशा प्रकारे गोव्यातील गुन्हेगारी ही बिगरगोमंतकीयांमुळे होतेय, हे सरकारी आकड्यावरुंन सिद्ध होते आणि तेच वास्तव आहे. मात्र गुन्हे गोव्यात घडतात, त्यात गुंतलेले गोमंतकीय असो की बिगरगोमंतकीय नाव गोव्याचेच बदनाम होतेय.

ही बदनामी गोव्याने का सहन करावी? गोव्याबाहेरचे लोक गोव्यात येऊन गुन्हे करतात आणि जातात, हे धाडस त्यांच्यात कसे येते? स्वत:च्या प्रांतात तो गुन्हा ते का करत नाहीत? याबाबत त्यांनी नव्हे, तर गोमंतकीयांनी आत्मपरीक्षण करायला हवे. गोव्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून ती पार पाडायला हवी. ‘गोव्यात या, आणि काही करा’ अशी समजूत गोव्याबाहेरच्या लोकांची झालेली आहे. गोव्यात येऊन आपण आपल्याला नको त्या माणसाचा सहज काटा काढू शकतो. गोव्यात येऊन आपण एखादे घर, बंगला लुटून लाखो रुपयांचे दागिने पळवू शकतो. गोव्यातील कोणत्याही चोरी, लुटीत आपल्याला लाखो रुपयांचे घबाड सहज मिळू शकते हे गुन्हेगारांना माहीत झालेले आहे, म्हणून म्हापशातील दरोड्यांसारखे दरोडे गोव्यात वारंवार पडतात. गोव्यात येऊन एखादा गुन्हा केल्यानंतर त्याच्यातून आपण सहीसलामत सुटू शकणार, असे गुन्हेगारांना वाटत असते, तर का? गोव्यातील पोलीस, कायदा व सुव्यवस्था, न्यायालय आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असेच त्यांना वाटत असते काय? गुन्हा करण्यापूर्वी ते गोव्यात येतात तेव्हा त्यांना कोणाची साथ लाभते? गोमंतकीयांचीच. एकंदरीत गोव्याला बदनाम करणाऱ्या गुन्हेगारीकडे गांभीर्याने पहायला हवे. त्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या यंत्रणा आहेत, त्यांनी आपली जाबाबदारी प्रामाणिपणे सांभाळावी लागणार आहे.

गोव्याच्या किनारी भागात जो बेकायदेशीरपणा चालतो, जी गुन्हेगारी चालते ती गोव्याला जगात बदनाम करत आहे. ही गुन्हेगारी शंभर टक्के बिगरगोमंतकीयांची असली तरीही त्यांना साथ देणारी व्यवस्था गोमंतकीयच आहे. पर्यटकांची लूट, पर्यटकांना मारहाण, दलाली-व्याभिचार्य, त्यातून घडणारे खून हे सारे कुणाच्या जोरावर चालते? हप्तेगिरीमुळे चालते ही गुन्हेगारी! ही गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारला कठोर पावले उचलावीच लागतील, अन्यथा गोवा पूर्णत: बदनाम होऊन गोव्याचे पर्यटक अन्यत्र वळतील आणि गोवा आर्थिक संकटात येईल, जसा खाणबंदीमुळे आलाहोता.

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article