गुन्ह्याची कागदपत्रे उपनिरीक्षकाकडूनच गहाळ
सातारा :
फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, धक्काबुक्की या प्रकरणाचा गुन्हा उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 167/2015 रोजी दाखल होता. त्या गुह्याचा तपास तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर आवळे हे करत होते. मात्र, त्यांनी या गुह्यातील मुळ कागदपत्रेच गहाळ केल्याची बाब उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर आवळे यांच्यावर शासकीय दस्तऐवज नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
आजपर्यंत अनेक घटनांमध्ये ऐकायला मिळत होत्या की, पोलीस असो वा कोणतीही शासकीय यंत्रणा ही एकमेकांना सहाय्य असते. एकमेकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. परंतु सातारा जिह्यात प्रथमच एका तपास अधिकाऱ्यावर कागदपत्रे गहाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलीस ठाण्यात मुरलीधर कृष्णाजी आवळे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून दि. 25 मे 2016 ते दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या काळात कर्तव्यास होते. ते सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांच्याकडे उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 167/2015 चा तपास होता. त्या गुह्याचा तपास करुन त्यांनी न्यायालयात मुळ कागदपत्रे सीआरपीसी 173 प्रमाणे दाखल करणे अनिवार्य होते. मात्र, त्यांनी मुळ कागदपत्रे न्यायालयात दाखल केलेली नाहीत. त्यांना सूचना देवूनही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्यांनी कर्तव्यात कसूर केली. त्यामुळे त्यांच्यावर कागदपत्रे गहाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.