आंबेवाडी ग्रा. पं.माजी अध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा
सचिवावर हल्ला : हल्लेखोरांच्या अटकेसाठी काकती पोलिसांकडून प्रयत्न, जखमीवर उपचार सुरू
बेळगाव : घराचा उतारा अनधिकृतरित्या देण्यास नकार दिल्यानेच आंबेवाडी ग्रा. पं. च्या सचिवावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवार दि. 10 रोजी घडली आहे. याप्रकरणी आंबेवाडी ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष चेतन पाटील (रा. गोजगा) यांच्यासह पाच जणांविरोधात काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. चेतन पाटील (रा. गोजगा), विक्रम लक्ष्मण यळगूकर (रा. आंबेवाडी), शिवू जंगम (रा. गोजगा) यांच्यासह अन्य दोघा अनोळखींवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सचिव नागाप्पा बसाप्पा कोडली (रा. गणिकोप्प, ता. बैलहोंगल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून संशयितांच्या अटकेसाठी प्रयत्न चालविले आहेत.
नागाप्पा हे आंबेवाडी ग्रा. पं. मध्ये सचिव म्हणून सेवा बजावित आहेत. काही दिवसांपासून संशयित चेतन व विक्रम या दोघांनी सचिव नागाप्पा यांच्याकडे घराचा अनधिकृत उतारा देण्यासाठी तगादा लावला होता. मात्र त्यांनी उतारा देण्यास नकार दिल्याने संशयितांनी राग धरला होता. सोमवारी दुपारी सचिव नागाप्पा हे आपल्या दुचाकीवरून मण्णूरकडे जात असताना पाच जणांनी त्यांना वाटेत अडविले. त्यानंतर त्यांच्या डोकीत, तसेच शरीरावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. डोकीत वर्मी वार बसल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर काहींनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
ही माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमीची विचारपूस करण्यासह जबानी नोंदवून घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आंबेवाडी ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. सचिवावर हल्ला झाल्याचे समजताच रोहयोअंतर्गत काम करणाऱ्या महिलांनीही जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. हल्लेखोरांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर महिला निघून गेल्या.
भाषिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये
सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने मंगळवारी तालुक्यातील विविध ग्रा. पं. चे पीडीओ, सेक्रेटरी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणाला काहींनी भाषिक रंग देण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र फिर्यादी नागाप्पा यांनी हे प्रकरण वेगळ्या कारणातून झाले असून याला कोणीही भाषिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन व्हिडिओद्वारे केले आहे. हल्लेखोरांच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे सांगितले.