शिरोडा-वेळागरवाडीत घर फोडून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
अज्ञात चोरट्यावर गुन्हा
वेंगुर्ले (वार्ताहर)-
शिरोडा वेळागरवाडी येथील सुरभी सुरेंद्र कलंगुटकर (५०) या रत्नागिरी येथे गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या दर्शनी दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यामध्ये ठेवलेले ठेवलेल्या ५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे ५,७१,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०५, ३३१ (३). ३३१ (४) अन्वये वेंगुर्ले पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .शिरोडा वेळागरवाडी येथील सुरभी सुरेंद्र कलंगुटकर (५०) या ३ जुलै रोजी सायंकाळी ७ ते ४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत आपल्या घरी नव्हत्या. याच वेळेदरम्यान चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला, लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यामध्ये ठेवलेल्या ४४ ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या बांगड्या ( अंदाजे किंमत १,५४,००० रुपये), २० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या पाटल्या (किमंत ७०,००० रुपये), ३५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या साखळ्या (किमंत १,२२,५०० रुपये), २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे ४ कानातले जोड (किंमत ७५,००० रुपये), २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे २ हार (किंमत ७५,००० रुपये), ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे २ कानातील पट्टे (२१,०००), १४ग्रॅम वजनाचे सोन्याचे धातूचे काळे मणी असलेले मंगळसूत्र (४९,०००) असा मुद्देमाल तर १०/-, २०/- ५०/- १००/- व २००/- अशा भारतीय चलनाच्या नोटा एकूण रक्कम रुपये ५,००० अशी एकूण रुपये ५,७१,५०० चा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, हेडकॉन्स्टेबल अजित जाधव व प्रसाद कदम यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर करीत आहेत.