कार्यालयातीलच दोन वरिष्ठांवर गुन्हा
सांगली :
पाटबंधारे खात्यातील शिपाई महेश मुकुंदराव कांबळे यांचा चार वर्षे छळ व जातीवाचक टोमणे मारून रेल्वे खाली आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाटबंधारे सांगली मंडळ कार्यालयातील दोन वरिष्ठ लिपिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सुनील चौगुले आणि गणेश जोशी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यालयाचे वरिष्ठ उपअभियंता गलगली यांच्यासह शिपायाच्या तक्रारीवर कारवाई न केल्याने अधीक्षक अभियंता पाटोळे यांचीही चौकशी होणार आहे.
कोरोना काळात वरिष्ठांना सांगून एका रुग्णाला भेटायला शिपाई महेश कांबळे गेले होते. त्या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने लिपिक सुनील चौगुले (रा. वारणाली, विश्रामबाग) याने चार वर्षांपूर्वी कांबळे याला कार्यालयात शिवीगाळ केली आणि तेव्हापासून तो आणि त्याचा सहकारी लिपिक मित्र गणेश जोशी (या. हरिपूर रोड,) यांनी वेगवेगळ्या प्रकारे छळ सुरू केला. गेली चार वर्षे त्याला ही जोडगोळी त्रास देत होती, अशी मृत महेश कांबळे यांची तक्रार होती. यामध्ये या कार्यालयाचे उपअभियंता गलगली यांनीदेखील त्रास दिला. मात्र नंतर विचारणा केल्यानंतर माफी मागून ते गप्प झाले अशी या प्रकरणाची पूर्वपिठिका आहे.
नोव्हेंबर महिन्यात महेश कांबळे यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जामध्ये वरील सर्व घटनाक्रमाचा उल्लेख आहे. कार्यालयात इंटरनेटची वायर काढणे, झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर बंद पाडणे, सेवा रद्द करण्याबाबत हस्तक्षेप करणे, कार्यालयातील सीडी काढणे, दुसऱ्या वरून जातीवाचक टोमणे मारणे, आळ घेणे, नको त्या चर्चा उठवणे, कार्यालयात कोठेही बसले की आक्षेप घेणे अशाप्रकारे मानसिक छळ केला जात होता.
आपण त्रासाला कंटाळून बदलीसाठी अर्ज केला, दोघांवर कारवाई होत नाही म्हणून तीन महिने कार्यालयात गेलो नाही, असे अधीक्षक अभियंत्यांना लिहिलेल्या तक्रारीत महेश कांबळे यांनी म्हटले आहे. यामध्ये चौगुले, जोशी आणि गलगली या तिघांचाही स्पष्ट उल्लेख आहे. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे निराश होऊन कांबळे यांनी आपले जीवन संपवले अशी नातेवाईकांची तक्रार होती.
प्रकरण अॅट्रॉसिटीशी संबंधित असल्यामुळे सांगलीच्या पोलीस उपाधीक्षक मीनल एम यांच्याकडे तपास आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक चेतन माने यांनी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे जबाब घेतल्यानंतर याप्रकरणी चौगुले आणि जोशी या दोघांच्यावर दलित उत्पीडन कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. दरम्यान तक्रारीत नाव असलेले गलगली तसेच तक्रार केल्यानंतरही पुढची कारवाई न केल्यामुळे पाटबंधारे मंडळ विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्याकडेही पोलीस चौकशी करणार असल्याचे समजते. या प्रकरणांमध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. दरम्यान या घटनेमुळे पाटबंधारे खात्यात एकच खळबळ माजली असून कर्मचारी आत्महत्या आणि कार्यालयातीलच दोन लिपिकांवर गुन्हा दाखल झाल्याने दिवसभर या कार्यालयात शुकशुकाट होता.
व्हिडिओ व्हायरल करून आत्महत्या
महेश कांबळे यांनी महिन्याभरापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. यामध्ये सुनील चौगुले, गणेश जोशी आणि गलगली यांचे नाव घेऊन यांच्याकडून आपल्याला त्रास दिला गेला. त्यामुळे आपण प्रचंड कष्टी झालो असल्याचे आणि त्यांच्या विरोधात तक्रार करून सुद्धा कारवाई होणार नसल्याने आपणच आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. त्याची दखल घेऊन संजयनगर पोलिसांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त करून संबंधितांबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार 11 नोव्हेंबर रोजी अधीक्षक अभियंता यांच्याकडे त्याने तक्रार केली होती. मात्र त्यानंतरदेखील कारवाई न झाल्याने निराश झालेल्या महेश कांबळे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केला,r असे नातेवाईकांनी तक्रारीत म्हटले आहे.