For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनार्दन रेड्डी श्रीरामुलूंसह 11 जणांवर गुन्हा

06:45 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
जनार्दन रेड्डी श्रीरामुलूंसह 11 जणांवर गुन्हा
Advertisement

बळ्ळारीतील धुमश्चक्री प्रकरण : अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचा आदेश

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

बळ्ळारी शहरात माजी मंत्री व भाजप आमदार जनार्दन रेड्डी यांच्या निवासस्थानाजवळ गुरुवारी रात्री बॅनर लावण्यावरून दोन गटात संघर्ष झाला. वाद चिघळल्यानंतर गोळीबाराचीही घटना घडली होती. याप्रकरणी जनार्दन रेड्डी, माजी मंत्री बी. श्रीरामुलू, माजी आमदार सोमशेखर रेड्डी यांच्यासह 11 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनेसंबंधी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

बळ्ळारीत गुरुवारी 3 रोजी वाल्मिकी पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. कार्यक्रमाचा बॅनर लावण्यावरून गुरुवारी रात्री भाजप आमदार जनार्दन रेड्डी व काँग्रेस आमदार नारा भरत रेड्डी यांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री झाली. दगडकेफ, हवेत गोळीबाराची घटनाही घडली होती. प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार व जमावावर लाठीमार केला. खासगी गनमॅनकडून झालेल्या गोळीबारात काँग्रेस कार्यकर्त्याचा बळी गेल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी शहरात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. शुक्रवारी आयजीपी रविकांतेगौडा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बळ्ळारीत ठाण मांडले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

घटनेत काँग्रेस कार्यकर्ता राजशेखर याचा बळी गेला. त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार नारा भरत रेड्डी यांचे निकटवर्तीय चुनाळ शेखर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे जनार्दन रेड्डीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात त्यांना पहिले आरोपी बनविण्यात आले आहे. त्यांचे बंधू सोमशेखर रेड्डी माजी मंत्री बी. श्रीरामुलू, बळ्ळारी महानगरपालिकेतील विरोधी गटनेते मोदतकर यांच्यासह 11 जणांविरुद्ध बळ्ळारीतील ब्रुस पेठ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.

आयपीएस अधिकारी निलंबित

बळ्ळारीत आमदार जनार्दन रेड्डी यांच्या निवासस्थानाजवळ गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबार व काँग्रेस कार्यकर्त्याच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने जिल्हा पोलीस प्रमुख पवन नेज्जार यांना निलंबित केले आहे. शुक्रवारी सायंकाळी हा आदेश जारी करण्यात आला. हिंसाचाराची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य माहिती दिली नाही. यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे आदेशपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नेज्जार यांनी गुरुवारी सकाळीच बळ्ळारी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली होती.

पुतळा अनावरण कार्यक्रम लांबणीवर

3 जानेवारी रोजी बळ्ळारीत महर्षि वाल्मिकी पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. त्यासाठी बॅनर लावण्यात येत होते. मात्र, आमदार जनार्दन रेड्डी यांच्या निवासस्थानाजवळ बॅनर लावण्यावरून वाद झाल्याने धुमश्चक्री झाली होती. या घटनेत काँग्रेस कार्यकर्त्याचा बळी गेल्याने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून पुतळा अनावरण कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. बळ्ळारी ग्रामीणचे आमदार बी. नागेंद्र यांनी ही माहिती दिली.

चौकशीची सूचना!

बळ्ळारीत माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या निवासस्थानाजवळ घडलेल्या दोन गटातील संघर्ष प्रकरणी चौकशी करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. या घटनेत काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेवेळी वापरलेल्या बंदुका कोणाच्या, याबाबत तपास करण्याची सूचना दिली आहे. सतीश रेड्डी यांनी हवेत गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता गोळी राजशेखरला लागली असावी. त्यामुळे याबाबत चौकशी करावी लागेल.

- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री

Advertisement
Tags :

.