क्रिकेट न्यूझीलंडचा 20 जणांशी मध्यवर्ती करार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
क्रिकेट न्यूझीलंडने 2024-25 च्या क्रिकेट हंगामासाठी 20 क्रिकेटपटूंबरोबर मध्यवर्ती करार केला आहे. मध्यवर्ती करार झालेल्या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये आता अष्टपैलु नाथन स्मिथ आणि जोश क्लार्कसन यांचा समावेश आहे.
न्यूझीलंडमधील राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धांमध्ये स्मिथ आणि क्लार्कसन यांच्या कामगिरीत सातत्य दिसल्याने त्यांना पहिल्यांदाच मध्यवर्ती करारासाठी बढती देण्याचा निर्णय क्रिकेट न्यूझीलंडने घेतलाआहे. क्लार्कसनने आतापर्यंत 3 वनडे आणि 6 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस क्लार्कसनने बांगलादेश विरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते.
नाथन स्मिथने न्यूझीलंडमध्ये झालेल्या प्लंकेट शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलु कामगिरी करताना फलंदाजीत त्याने 11 डावांत 245 धावा तर गोलंदाजीत त्याने 12 डावांत 33 गडी बाद केले आहेत. आगामी क्रिकेट हंगामात स्मिथ आणि क्लार्कसन यांना मध्यवर्ती करारात बढती मिळाली आहे.
मध्यवर्ती करारबद्ध क्रिकेटपटू-ब्लंडेल, ब्रेसव्हेल, चॅपमन, क्लार्कसन, डफी, मॅट हेन्री, जेमीसन, लॅथम, मिचेल, निकोल्स, रोरुकी, अझाझ पटेल, फिलीप्स, रचिन रविंद्र, मिचेल सॅन्टेनर, सिरेस, नाथन स्मिथ, सोधी, टीम साऊदी आणि विल यंग