क्रिकेट : भारत-पाकिस्तान ‘सुवर्ण’ लढत
उपांत्य फेरीत भारताचा लंकेवर दणदणीत विजय : पाकची बांगलादेवर मात
वृत्तसंस्था/निशीन
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेटमधील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत फायनल गाठली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने पहिल्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करत फायनलचे तिकीट मिळवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुरुष क्रिकेटच्या सुवर्णपदकासाठी मेगा फायनल रंगणार आहे. दि. 3 रोजी ही फायनल होईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 169 धावा केल्या. ईशान किशनने 46 चेंडूंत नाबाद 80 धावांची शानदार खेळी करत डाव सावरला.
त्याने 4 चौकार आणि 5 षटकार लगावले. वैभव सूर्यवंशीनेही 21 चेंडूंत 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे स्टार फलंदाज अपयशी ठरले. याशिवाय, अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. इशानने मात्र फटकेबाजी करत भारतीय संघाला 169 धावापर्यंत मजल मारुन दिली. लंकन संघ अवघ्या 9.5 षटकांत 45 धावांत ऑलआऊट झाला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात श्रीलंकेला दोन मोठे धक्के दिले. त्यानंतर दुस्रया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर धावबाद झाल्याने श्रीलंकेने अवघ्या दोन षटकांत तीन विकेट गमावल्या.
भारतीय संघ सुवर्णपदक कायम राखण्यासाठी प्रयत्नशील
हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाला होता. फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करत टीम इंडियाने थेट सुवर्णपदकावर नाव कोरले. य्आता 2026 मध्ये भारतीय संघ सुवर्णपदक कायम राखण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 3 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्यात सुवर्णपदकासाठी रंगणार महामुकाबला क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे.
बांगलादेशला नमवत पाक फायनलमध्ये
आशियाई क्रीडा स्पर्धेतील अन्य एका उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला नमवत अंतिम फेरी गाठली आहे. पावसामुळे सामना 13 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 13 षटकांत 7 गडी गमावून 111 धावा केल्या. पाकिस्तानने हे 112 धावांचे लक्ष्य 11.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले.