For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कल्पक भारताचे वैश्विक योगदान

06:17 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
कल्पक भारताचे वैश्विक योगदान
Advertisement

प्राचीन भारताने जगाला शून्यातून फार मोठी भेट दिली व परिणामी साऱ्या जगाचे रूप-प्रारूपच बदलून गेले. शून्यामागच्या त्या संशोधनाला कल्पकतेची जोड होती व भारत आणि भारतीयांच्या त्या बौद्धिक कल्पकतेद्वारा जागतिक स्तरावर संशोधन -परिवर्तनाची परंपरा अद्यापही व सातत्याने कायम राहिली आहे. भारताच्या या वैश्विक योगदानामागे भारत आणि भारतीयांचे कार्य, कर्तृत्व यांच्याच जोडीला कल्पकतेची मोठी व महत्त्वाची साथ लाभली आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

Advertisement

या संदर्भातील मूलभूत व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानवीय विकास आणि प्रभावामागे नाविन्य आणि कल्पकता हे दोन महत्त्वाचे पैलू ठरले. ऐतिहासिक संदर्भांसह भारताच्या जागतिक स्तरावरील कल्पक व नाविन्यपूर्ण योगदानामध्ये थोडक्यात पण महत्त्वपूर्ण संदर्भात सांगायचे झाल्यास त्यामध्ये आर्यभट्टांच्या शून्यापासून भारतीय उपखंडात विकसित झालेली कपड्यांची बटन व मोतीबिंदू यासारख्या आजारावर छोट्या शस्त्रक्रियेसह ‘अष्टपद’च्या माध्यमातून विकसित बुद्धिबळ इत्यादीचा थोडक्यात सांगता येईल.

विकसित कालौघातसुद्धा भारताच्या या कल्पक व नवनवीन कल्पनांचा प्रवाह निरंतर सुरूच राहिला आहे. या प्रवासात भारत आणि भारतीयांनी घरापासून व्यापारापर्यंत व विज्ञानापासून तंत्रज्ञानापर्यंतचे विकासाचे विविध टप्पे यशस्वीपणे पार पाडले आहेत. मुख्य म्हणजे या साऱ्या प्रक्रियेत देश आणि देशवासी या उभयतांचा विकास तर झालाच व त्याचा फायदा जगाला झाला. सध्याच्या व्यावसायिक स्थितीत व्यवसायपूरक व नाविन्यपूर्ण कल्पना कुणाकडून व कुठल्याही स्वरूपात येऊ शकते. या नव्या कल्पक व्यवसायाची सुरुवात ज्याला त्या विषयाचे ज्ञान आणि माहिती असेल अशी कुणीही यशस्वीपणे करु शकते. यासंदर्भात पश्चिम घाट क्षेत्रातील एका दुर्गम खेड्यातून संगणकीय पद्धतीवर आधारित म्हणजेच ‘ऑनलाइन’ स्वरूपातील स्टार्टअपचे उदाहरण प्रामुख्याने देता येईल. श्रीधर वेंबू या ग्रामीण इंजिनिअरच्या ‘झोहो’ या आगळ्यावेगळ्या स्टार्टअपने आपल्या कारभाराच्या उलाढालीचा सहा हजार कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे.

Advertisement

या नव्या व कल्पक कार्यपद्धतीसह स्टार्टअपसह विविध व्यवसायांच्या उभारणीसाठी फारशा प्रगत तंत्रज्ञान व व्यवसाय तंत्राची आवश्यकता नसते. यासंदर्भात व्यवसाय केंद्रित कल्पनाच पुरेशी ठरते. देशांतर्गत दुग्धोत्पादन व वितरण या अक्षरश: गाव केंद्रित उपक्रमाची यशोगाथा आजही मार्गदर्शक ठरू शकते.

दुग्धव्यवसायाच्या संदर्भात परंपरागतरित्या सांगायचे म्हणजे विशेष कालावधीत दुधाचे अतिरिक्त उत्पादन होत असे. परिणामी दूध आणि दुधाशी संबंधित सर्व प्रक्रियांसह व्यवसाय करून सुद्धा दूध वाया जात असे. परिणामी दूध उत्पादकांसह शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होत असे. याउलट विशेष कालावधीत दुधाचा खप-वापर वाढल्याने दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांची कमतरता होत असे व त्याचा भार सर्वसामान्य जनतेसह ग्राहकांवर पडत असे, हा इतिहास आहे.

यावर मूलभूत व दूरगामी स्वरूपाची उपाययोजना शोधून काढली ती डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांनी. यासाठी त्यांनी द्विस्तरीय कार्यपद्धती केवळ सुचवलीच नाही तर यशस्वीपणे अमलात देखील आणली. या नव्या व ऐतिहासिक प्रयत्नात डॉक्टर कुरियन यांनी गुजरातच्या आणंद या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादन करणाऱ्या परिसरातून केली.

यासाठी डॉक्टर कुरियन यांनी दुग्धोत्पादन शेतकऱ्यांच्या सामूहिक व सहकारी प्रयत्नांना प्राधान्य देण्यात आले व तसे प्रयत्न केले. यातून सहकारी तत्त्व व व्यवस्थेतून आणंद परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संबंध केवळ दूध उत्पादनापर्यंतच मर्यादित न ठेवता दूध संकलन, वाहतूक-साठवण, उत्पादन प्रक्रिया व त्याद्वारे दुधाच्या विविध प्रकारच्या व विविध प्रकारे ग्राहकोपयोगी उत्पादनांची सुरुवात झाली व ‘आणंद’च्या श्वेतक्रांतीची प्रगती निरंतर सुरू आहे

स्टार्टअपसह आपल्या नव्या व प्रस्तावित नवीन उद्योगांच्या संदर्भात सांगायचे म्हणजे या क्षेत्राला आता सुदृढ धोरण लाभले आहे. आता त्याला जर नव्या, उद्योगप्रवण व प्रगतशील धोरणांची जोड लाभली तर विकसनशील उद्योगांना चालना मिळू शकते हा विश्वास आता निर्माण झाला आहे. यातून विविध उद्योगच नव्हे तर सेवाक्षेत्रात उद्योगानुकूल वातावरण निर्माण झाले आहे. युवा वर्गात उद्यमशीलता व नव्या संकल्पनांसह प्रोत्साहन देऊन त्यांना स्वत:चा छोटेखानी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण-प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम आपल्या शैक्षणिक व तंत्रज्ञान संस्था करीत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यालाच साथ दिली जाते ती नीती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग, अटल इनोव्हेशन सेंटर, विविध विद्यापीठ यांची उपयुक्त साथ या प्रयत्न-प्रकल्पांना समर्थ साथ मिळत आहे हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.

बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अंतर्गत कार्यरत असणाऱ्या उद्यमशीलता केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सी. एस. मुरली यांच्या मते सद्यस्थितीत आमचा भर युवा विद्यार्थ्यांमध्ये कल्पकतेसह उद्यमशीलता व त्याद्वारा उपक्रमशील व संशोधनावर आधारित प्रगतीशील उद्योजक व उद्योग पूरक वातावरण निर्मितीवर आहे. त्यांच्या मते या प्रयोगशील परिवर्तनाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली हे विशेष. आपल्या नव्या स्टार्टअपपासून विदेशातील अनेक नवउद्योजकांनी प्रेरणा घेतली असून अनेकांनी त्याचे अवलंबन केले आहे. भारतीयांसाठी ही बाब अभिमानास्पद ठरली.

याच्याच जोडीला जागतिक स्तरावर उल्लेखनीय ठरलेली बाब म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या भारतातील प्रतिष्ठित तंत्रज्ञान-संशोधन संस्थेने विशेषतत्वाने सुरू केलेल्या बेलॅट्रिक्स एरोस्पेस यासारख्या स्टार्टअपची संकल्पना व केलेले काम. या प्रगत स्टार्टअपद्वारा अंतराळ क्षेत्रासाठी आवश्यक उपकरणे आणि वाहनांचे संशोधन करून त्यांचा प्रभावी व उपयुक्त केलेला वापर. त्याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रासच्या तंत्रज्ञान-संशोधन विकास विभागाद्वारा विकसित केलेल्या ‘अॅथर’सारख्या विद्युत चलित दुचाकी वाहनाची निर्मिती. या विभागाने आजवर सुमारे 280 स्टार्टअपची सुरुवात करण्यासाठी यशस्वी योगदान दिले असून सध्याची उलाढाल सुमारे 33 हजार कोटी आहे.

आजवर भारताने नवउद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. अनेक संदर्भात तर भारतीयांनी सर्वप्रथमतेसह आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. या प्रयत्नांना संशोधनासह नाविन्य व उपयुक्ततेची जोड दिली आहे. या संदर्भातील प्रचलित पुढाकारानुसार भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी प्रक्रिया उद्योगांमध्येसुद्धा आपली छाप आणि प्रभाव टाकण्यास सुरुवात केली असून त्याचे परिणाम दिसून यायला लागले आहेत. या सुधारणा अनेकार्थांनी वेगळ्या आणि वैशिष्ट्यापूर्ण ठरल्या असून यापूर्वी युरोप-अमेरिकेसह प्रगत देशांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय नव-उद्योजकांचे या संदर्भातील महत्त्व जाणले आहे.

भारताच्या कल्पक तंत्रज्ञानाने जगाला आश्चर्यचकित तर केलेच, शिवाय प्रसंगी अंतरिक्षाला गवसणी घालण्याचे महनीय काम केले आहे. यासंदर्भात विशेष उल्लेखनीय बाब म्हणून ‘इस्रो’च्या मंगलयान अभियानाचे उदाहरण देता येईल.  ज्या कौशल्य, तंत्रज्ञान व प्रगतीशील विचारांसह काम करण्यात आले, त्याचाच परिणाम म्हणून ‘नासा’च्या चांद्रमोहिमेपेक्षा वेळ आणि खर्चाची विलक्षण बचत करून भारताचे मंगलयान अभियान यशस्वी केलेले उभ्या जगाने पाहिले आहे.  यातून भारताचे विकसित तंत्रज्ञान व संशोधनशैली, उद्यमशीलता, उद्योजक व तंत्रज्ञान यांचे योगदान बहुचर्चित झाले आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा प्रयोग आणि उपयोग यांचे फायदे सर्वांना लक्षात आले आहेत. याचे मूळ संगणक विज्ञानासह प्रगत तंत्रज्ञानाच्या विकसित स्वरूपातील उपयोगातून सिद्ध झाले आहे. भारताचे नव-उद्योजक व कल्पक स्टार्टअप या विकसित उद्यमशीलतेचे नेतृत्व करीत आहेत. यूपीआय सारख्या प्रगत पद्धतीचा व्यापक स्वरूपात इतर देशांमध्ये वापर होणे ही बाब तंत्रज्ञान-विकसनशील स्टार्टअप क्षेत्राच्या वाढत्या जागतिक प्रभावाला बळकटी देत आहे.

-दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.