For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेश गीतेची निर्मिती

06:01 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेश गीतेची निर्मिती
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

श्रीगणेशाच्या अवतारकार्यातील एका प्रसंगामुळे ‘गणेश गीता’ निर्माण झाली. तो प्रसंग असा. ओंकार परब्रह्माने देवांना त्रास देतो म्हणून स्वर्गलोकातून हाकलून दिलेला सिंदुरासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर येऊन येथील ऋषीमुनींना त्रास देत असतो. सर्व धार्मिक अनुष्ठानांचा विध्वंस करून धुमाकूळ घालत असतो. ऋषी ह्या राक्षसाचा नाश व्हावा म्हणून ओंकाराचा धावा सुरु करतात. तेव्हा मी शिवपार्वतीच्या उदरी येऊन त्या राक्षसाचा वध करीन अशी ओंकाराची आकाशवाणी होते. त्यानुसार श्रीगणेशाचा जन्म होतो. तो आठ वर्षाचा झाल्यावर त्यांची मुंज होते. एके दिवशी त्याने पाराशरऋषीना सिंदूराच्या जुलमाने सर्व यज्ञयागादी कर्मे बंद पडल्याचे सांगितले व त्याच्या वधाची आज्ञा त्याने घेतली. नंतर श्रीगणेशाने शिव-पार्वतीचे आशीर्वाद घेतले आणि गर्जना करीत सिंदूराच्या नगरापर्यंत तो पोहोचला. त्याच्या गर्जनेने सिंदूरासह सर्व दैत्य मूच्छित होऊन पडले. दूतांनी त्यास तू कोण आहेस, असे विचारले असता मी पार्वतीशंकरांच्या उदरी जन्मलेला व पाराशरऋषींच्या वात्सल्याने वाढलेला प्रत्यक्ष परमात्मा आहे व गर्विष्ठ झालेल्या सिंदूराचा वध करण्यासाठी आलो आहे, असे सांगून त्याने सिंदुराला युद्धाचे आवाहन केले.

युद्धाला सुरवात करताना गजाननाने आकाश भेदणारी मस्तके आणि पाताळे भेदणारे पाय असे अनेक मस्तके, अनेक नेत्र, अनेक हात असे विराट रूप धारण केले व तो सिंदूराजवळ आला असता सिंदूर भयभीत झाला. तरीही धीर करून आपल्या हातातील खड्गाचा प्रहार त्याने गजाननावर केला. तोच गजाननाने त्याला धरले आणि आपल्या अंगाने त्याचे अंग मर्दून टाकले. त्याच्या अंगातील तांबड्या रक्ताने गजाननाच्या अंगाचाही रंग तांबडा झाला. त्यामुळे त्याला ‘सिंदूरवदन’, ‘सिंदूरप्रिय’ इत्यादी नावे पडली. अशा तऱ्हेने गणेशाने उन्मत्त सिंदूराचा वध केल्यावर देवांनी त्याचा जयजयकार केला. नंतर सर्व राजे गजाननाच्या भेटीसाठी आले. त्यात वरेण्य राजाही होता. त्याने गणेशाच्या स्वरूपावरून आपण अरण्यात टाकून दिलेला आपला पुत्र तो हाच हे ओळखले. आपल्या अज्ञानाबद्दल त्याने गणेशाची क्षमा मागितली. तेव्हा गजानन म्हणाला, वरेण्या, खेद करू नकोस. तू आणि तुझ्या पत्नीनं पूर्वजन्मी अति तीव्र तपश्चर्या केली आणि मी प्रसन्न झाल्यावर स्वत:साठी मोक्ष न मागता, मी तुमच्या उदरी जन्मास यावं असा वर मागितलात, म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणं मी तुमच्या घरी आलो. आता मी निजधामास जातो. त्यावर वरेण्य म्हणाला, ‘देवा, मला मोक्ष प्राप्त होईल असा काही उपदेश करा.’ त्यानंतर गजाननाने वरेण्याला योगमार्गप्रकाशक, सर्वसिद्धिदायक, अज्ञाननाशक आणि मनुष्यजीवनाचे उद्दिष्ट सांगणारी ‘गणेशगीता’ सांगितली. ती श्रवण करून त्यानुसार आचरण केल्याने वरेण्य राजाला मोक्ष मिळून तो जीवन्मुक्त झाला. म्हणून सर्वांनी ती पठण करण्यासारखी आहे.

Advertisement

ब्रह्मदेव म्हणाले,

एवमेव पुरा पृष्ट: शौनकेन महात्मना ।

स सूत: कथयामास गीतां व्यासमुखाच्छ्रुताम्  ।।1 ।।

अर्थ-सुरवातीला ब्रह्मदेवानी व्यासमुनींना गणेशगीता सांगितली. पुढे, व्यास मुनींनी सूत मुनींना त्यांच्या विनंतीवरून गणेशगीता सांगितली. विनंती करताना ते म्हणाले,

अष्टादशपुराणोक्तममृतं प्राशितं त्वया ।

ततो तिरसवत्पातुमिच्छाम्यमृतमुत्तमम् ।। 2 ।।

अर्थ-सूत म्हणाले, अठरा पुराणांमध्ये तुम्ही सांगितलेले अमृत मी प्राशन केले. त्याच्याहून मधुरतर असे उत्तम अमृत प्राशन करण्याची माझी इच्छा आहे.

येनामृतमयो भूत्वा पुमान्ब्रह्मामृतं यत: ।

योगामृतं महाभाग तन्मे करुणया वद ।।3 ।।

अर्थ-ज्याच्या योगाने पुरुष अमृतमय होऊन ब्रह्मस्वरूपी अमृताप्रत जातो ते योगामृत, हे महाभागा, कृपा करून मला सांगा.

क्रमश:

Advertisement
Tags :

.