‘नॅनो’ व्हायोलिनची निर्मिती
सांप्रतच्या विज्ञानयुगात संशोधकांनी अनेक आश्चर्यकारक वस्तू आणि साधने निर्माण करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. नॅनो टेक्नॉलॉजी किंवा सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अशा वस्तू बनविल्या जात आहेत. लफबरो विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागाने प्राध्यापक केली मॉरिसन यांच्या नेतृत्वात एका सूक्ष्म व्हायोलिनची निर्मिती केली आहे. हे व्हायोलिन इतके छोटे आहे, की त्याची रुंदी माणसाच्या केसाच्या जाडीपेक्षाही कमी आहे. खरे तर हे व्हायोलिन नाहीच. तर ती प्लॅटिनम या सोन्यापेक्षाही महाग असणाऱ्या धातूने बनविलेली व्हायोलिनची प्रतिमा आहे. पण ती इतकी खऱ्या व्हायोलिनसारखी दिसते की पाहणाऱ्याची फसगत होते.
हे ‘व्हायोलिन’ 35 मायक्रॉन लांब आणि 13 मायक्रॉन इतकी आहे. एक मायक्रॉन म्हणजे एका मीटरचा दशलक्षावा भाग. किंवा एका मिलिमीटरचा एक हजारावा भाग. मानवाचा एक केस किमान 50 मायक्रॉन जाडीचा असतो. याचाच अर्थ असा की या व्हायोलिनची लांबी माणसाच्या केसाच्या किमान जाडीपेक्षाही कमी आहे. या व्हायोलिनच्या निर्मात्यांनी ही प्रक्रियाही स्पष्ट केली आहे. प्रथम त्यांनी एका चिपवर ‘रेझिस्ट’ नामक जेलसारख्या पदार्थाचा लेप दिला. नंतर ही चिप त्यांनी मायक्रोफ्रेझर नामक साधनात बसविली. या मायक्रोफ्रेझरमध्ये वेगाने फिरणारी एक उष्ण सुयी असते. या सुयीच्या साहाय्याने त्यांनी या जेलवर अत्यंत सूक्ष्म व्हायोलिनची प्रतिमा चितारली. नंतर नको असलेला लेप काढून टाकण्यात आला. अशा प्रकारे खऱ्या व्हायोलिनसारखी दिसणारी नॅनो प्रतिमा साकारली आहे.
या तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यकाळात अनेक स्थानी होणार आहे. सूक्ष्म तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भविष्यात मानवी अवयवही निर्माण केले जाऊ शकणार आहेत. त्यामुळे अशा प्रयोगांचे महत्व आहे. नॅनोलिथोग्राफी असे या तंत्रज्ञानाला संबोधले जाते. भविष्यकाळात या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक ‘चमत्कार’ घडविले जाणार आहेत आणि भौतिक शास्त्र तसेच तंत्रज्ञानात क्रांती घडणार आहे, असे शास्त्रज्ञांचे प्रतिपादन आहे. भारतातही अशा तंत्रज्ञानावर संशोधन केले जात आहे.