For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व्यापक जागृती करा

06:17 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व्यापक जागृती करा
Advertisement

राज्य महिला आयोग अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

Advertisement

बेळगाव/प्रतिनिधी

महिला व मुलींवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी 1098 हा साहाय्यवाणी मदत क्रमांक लावण्यात यावा. याबाबत व्यापक प्रमाणात जागृती करण्यात यावी, अशी सूचना कर्नाटक राज्य महिला आयोग अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी केली.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शनिवारी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या बोलत होत्या. जिह्यामध्ये महिला व मुलींवर अन्याय, अत्याचार होऊ नये या दृष्टीने कठोर उपाययोजना राबविण्यात याव्यात. जिह्यातील सौंदत्ती, बैलहोंगल, गोकाक या तालुक्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक तीन महिन्यांतून एकदा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागृती करण्यात यावी. बालविवाह रोखण्यासाठी शाळा- महाविद्यालयांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी जागृती करण्यात यावी. सखी वन स्टॉप 1098 या साहाय्यवाणी क्रमांकाची जागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. ही सेवा निरंतर कार्यरत राहावी. सखी साहाय्यवाणी केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कायम ठेवण्यात यावे. तेथील कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचे वेतन त्वरित देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. उज्ज्वल महिला संरक्षण केंद्राच्या माध्यमातून इतर राज्यांतून आलेल्या महिलांना संरक्षण देऊन त्यांना आश्रय देण्यात येत आहे. पैशाच्या आमिषाला बळी पडून अनेक महिला बेपत्ता होत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. महिला आणि बालकल्याण विकास अधिकारी यांनीही याबाबत जागृती करून मोहीम राबवावी, अशी सूचना अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी केली.

जिह्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर महिला आणि बाल संरक्षण समितीची रचना करण्यात आली आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचार, बालविवाह, पोक्सो प्रकरण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रति तीन महिन्याला बैठक घेऊन जागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती, एसीपी सदाशिव कट्टीमनी, महिला आणि बालकल्याण खात्याचे उपसंचालक आर. नागराज, विविध सांत्वन केंद्राचे संयोजक, महिला आणि बाल विकास खात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.