For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकांच्या समस्यांवर उपाय देणारी उपकरणे निर्माण करा

11:06 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोकांच्या समस्यांवर उपाय देणारी उपकरणे निर्माण करा
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन : व्हीटीयूमध्ये प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन

Advertisement

बेळगाव : भविष्यातील अभियंत्यांनी लोकांच्या समस्यांवर उपाय देणारी उपकरणे निर्माण करून लोकांचे जीवन सोपे करावे. विद्यार्थ्यांनी प्रकल्प प्रदर्शनात उत्साहात सहभाग घेतला, ही आनंदाची बाब आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सिद्धांत वर्गापेक्षा व्यावहारिक वर्ग अधिक महत्त्वाचे आहेत. यासाठी अशाप्रकारच्या प्रकल्प प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

व्हीटीयू,व्हीआरआयएफ व एरा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिझाईन विद्यार्थी प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, प्रकल्प हे केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग नसावेत. त्याऐवजी त्यांनी लोकांच्या समस्यांवर उपाय दिले पाहिजेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा. नेहमीच एक ना एक समस्या असतेच. तंत्रज्ञानामुळे सर्व समस्या सुलभरित्या सोडविल्या जावू शकतात. यासाठी तंत्रज्ञानाच्या आधारे आपण लोकांचे जीवन साधे व सोपे बनवू शकतो, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

कुलगुरु प्रा. एस. विद्याशंकर म्हणाले, आम्ही राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त या प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रकल्प प्रदर्शन प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले असून आम्ही इनोव्हेशन डिझाईन थिंकिंगद्वारे विद्यार्थ्यांना श्रेय देतो. प्रदर्शित केलेल्या प्रकल्पापैकी आम्ही सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करणार असून त्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदतही करणार आहोत. प्रत्येक वर्षी अशाप्रकारचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हीटीयू अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या विविध विभागांमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 120 प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांसाठी तण काढणे, पेरणी करणे, रुग्णांसाठी उपयोगी असणारी उपकरणे, हिवाळ्यातील बर्फाचे पाण्यात रुपांतर करण्याचे तंत्रज्ञान आदी प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले. यावेळी प्रा. प्रसाद रामपुरे, संतोष इट्टणगी, डॉ. हरिष बेंडिगेरी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.