For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुचाकींना एकाच नंबरप्लेटची क्रेझ

02:36 PM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुचाकींना एकाच नंबरप्लेटची क्रेझ
Advertisement

‘कॅमेऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक’ करण्याची स्मार्ट क्लुप्ती

Advertisement

पणजी : राज्यात एका बाजूने सरकार आणि न्यायव्यवस्थासुद्धा वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी बसविण्यासंबंधी कठोर नियम बनवतात तर त्याच नियमांना वाकुल्या दाखवत खास करून तरुणांमध्ये दुचाकींसाठी एकाच क्रमांक पट्टीची क्रेझ निर्माण झाली आहे. हे सर्व प्रकार पोलिस आणि वाहतूक अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत चालले असतानाही कुणीही त्यांच्यावर कारवाई करण्यास धजत नाहीत. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे खुद्द राजधानीत जेथे शेकडो स्मार्ट कॅमेरे बसविलेले आहेत, आणि अधूनमधून वाहतूक पोलिसही कारवाईसाठी कार्यरत असतात, अशा गजबजलेल्या शहरातच या ‘सिंगल नंबरप्लेट’ दुचाक्या सर्वाधिक संख्येने दिसत आहेत. विशेष म्हणजे अशा दुचाकी चालविणारे सर्वजण तरुण असतात. यातील काहीजणांना हॅल्मेटही आवडत नाही, तर काहीजणांना कानाला मोबाईल लावून स्टाईल मारण्यात रस असतो, असेही दिसून येत आहे.

खरे तर वाहनांना एकसमान क्रमांकपट्ट्या असाव्यात, असा नियम आहे. त्याला अनुसरून काही वर्षांपूर्वी सरकारने ‘शीनमित’ नामक एका कंपनीला अशा क्रमांकपट्ट्या बसविण्याचे कंत्राट दिले होते. जेमतेम दीड ते दोन वर्षे धंदा केल्यानंतर त्यांनी गाशा गुंडाळला. तेव्हापासून पुन्हा एकदा ‘फॅन्सी’ आणि ‘सिंगल नंबरप्लेट’ ची पुन्हा एकदा क्रेझ आली आहे. त्याही पुढे जाताना काहीजण दुचाकीच्या क्रमांकपट्ट्यांना माती सदृश रंग फासतात. हे सर्व जाणीवपूर्वक केल्यासारखे वाटू नये यासाठी पट्टीवरील एखादे अक्षर किंवा क्रमांक लपवतात. या सर्व प्रकारांमागे ‘स्मार्ट कॅमेऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक’ करणे हा हेतू असतो, तसेच एखादप्रसंगी वाहतूक पोलिसाने अडविण्याचे प्रयत्न केल्यास त्यालाही चकमा देऊन पळ काढणे अशीही योजना असते. या प्रयत्नांमध्ये अनेकजण यशस्वीही होतात व तालाव मिळण्यापासून बचावतात, असेही दिसून आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.