कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केळशी किनाऱ्यावर 'गरवणी' मासेमारीची 'क्रेझ'

11:54 AM Sep 25, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

केळशी / संतोष आंजर्लेकर :

Advertisement

दापोली तालुक्यातील केळशी किनारपट्टीवर पारंपरिक गरवणी मासेमारीचा छंद आजही तितकाच जोमात आहे. विशेष म्हणजे हा छंद आता केवळ वृद्धांचा न राहता तरुणाई व शाळकरी मुलांचा आवडता विरंगुळा ठरताना दिसतोय.

Advertisement

नारळी पौर्णिमेनंतर पावसाला उघडीप मिळताच समुद्रकिनाऱ्याच्या खडकांवर जाऊन मासेमारी करणाऱ्यांची गर्दी सुरू होते. पारंपरिक पद्धतीतून आधुनिक साधनांकडे वळत अमावास्या व पौर्णिमेच्या दोन दिवस आधी व नंतर समुद्र ओहोटीवर असताना खडकांवर उभे राहून गरवणी मासेमारी केली जाते. केळशी किनाऱ्यावरील ही मासेमारी परंपरेचा वारसा, स्थानिकांची जीवनशैली आणि समुद्राशी असलेले अनोखं नातं याचं जिवंत चित्र आहे. चविष्ट मासे, थरारक क्षण आणि सामूहिक आनंदामुळे हा छंद मासेमारीपुरता मर्यादित न राहता केळशीच्या संस्कृतीचा भाग बनला आहे.

गरवणी मासेमारीत मिळणारे मासे खास चवीसाठी ओळखले जातात. यात गोबरा, तांब, पालू, कुवारली अशा माशांचा समावेश आहे. अनेकदा हातात शंभर रुपयांपासून थेट पाच-सहा हजार रुपयांपर्यंतची पकड लागते. हे मासे कुटुंब व मित्रमंडळींसह चवीने खाल्ले जातात.

या हंगामात शेती व इतर कामांना काहीशी मंदी असते. त्यामुळे तरुणाई तीन महिने हा छंद जोपासते. हळूहळू काही जणांनी पकडलेले मासे विक्रीसाठी टाकण्यास सुरुवात केली असून, यातून लहानसा रोजगार मिळण्याचा मार्ग खुला होत आहे.

'गरवणी 'म्हणजे गळ टाकून करण्यात येणारी मासेमारी, गळ टाकण्यासाठी काठीला तंगूस बांधला जातो. त्याला माशासाठी खाद्य लावले जाते. मोठ्या तंगूसाला गळ लावून लांब उडवणे याला 'पाका उडवणे' असे म्हणतात. ही जुनी पद्धत आजही लोकप्रिय असली, तरी नवीन पीढी बेरिंगवाले आधुनिक रॉड वापरताना दिसत आहे.

दुपारनंतर खडकांवर बसलेले मासेमारी करणारे तरुण, त्यांच्या हातातली गळ, तर कधी थरारक पकड हा देखावा पर्यटकांनाही आकर्षित करतो. अनेक पर्यटक या पारंपरिक मासेमारीला प्रत्यक्ष साक्षी राहतात आणि हा अनुभव विशेष मानतात.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article