न्हावेली-रेवटेवाडी पुलाच्या साईडपट्टीला भगदाड
अपघाताची शक्यता : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष , उपाययोजनेची मागणी
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली-पाडलोस मार्गावरील रेवटेवाडी येथील मोरीपुलाच्या साईडपट्टीला भगदाड पडून पूल वाहतूकीस धोकादायक बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन अपघात घडण्यापूर्वी उपाययोजनेची मागणी ग्रामस्थ तसेच नागरिकांमधून होत आहे. बांदा-शिरोडा मार्गावरील न्हावेली-रेवटेवाडी मोरी पूल वाहतूकीस धोकादायक बनला आहे. रात्रंदिवस येथून वाहतूक सुरू असते. शाळकरी मुलेही याचमार्गे प्रवास करतात. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सुमारे 25 वर्षांपूर्वीच्या पुलाची कोणतीही डागडुजी करण्यात आली नाही. पावसाळ्यात हलकासा पाऊस झाला तरी पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होते. सद्यस्थितीत येथील साईडपट्टी अत्यंत धोकादायक बनली आहे. पुलावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. मात्र ठेकेदार व अधिकाऱ्यांना साईडपट्टी निर्धोक करण्याचा विसर पडल्याचे सांगत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन साईडपट्टी पर्यायाने मोरीपूल वाहतूकीस निर्धोक करावे अशी मागणी ग्रामस्थ तसेच वाहनचालक, प्रवाशांमधून होत आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम करताना याकडे लक्ष देणे आवश्यक होते. ठेकेदाराने रस्त्याचे काम केले मात्र साईडपट्टीचे काय. भगदाड पडलेल्या धोकादायक साईडपट्टी व मोरीपूलाला दुर्लक्ष केलेले अधिकारीच जबाबदार असल्याचे प्रतिक्रिया न्हावेली-रेवटेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रावजी पार्सेकर यांनी दिली आहे.