For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राऊडी शिटरांविरुद्ध धडक कारवाई

08:40 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
राऊडी शिटरांविरुद्ध धडक कारवाई
Advertisement

पाच जिल्ह्यांतील पोलिसांची एकाच वेळी भल्या पहाटे मोहीम

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव उत्तर विभागातील पाच जिल्ह्यांत रविवारी भल्या पहाटे राऊडी शिटरविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेवरून पाच जिल्ह्यांतील पोलिसांनी तब्बल 1 हजारहून अधिक राऊडी शिटरच्या घरांचे दरवाजे ठोठावून तपासणी केली आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

बेळगाव उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संदीप पाटील यांनी पाच जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणेला गुन्हेगारी कारवाया थोपवण्यासाठी अधिक सक्रिय बनवले आहे. अमलीपदार्थांविरुद्धची मोहीम असो, वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची मोहीम असो, किंवा रविवारी सकाळी राबविलेली राऊडी शिटरविरुद्धची मोहीम असो, पूर्ण तयारीने यंत्रणा राबविण्यात येत आहे.

बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड व गदग या पाच जिल्ह्यातील जिल्हा पोलीसप्रमुखांबरोबरच संपूर्ण पोलीस यंत्रणेने गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईसाठी कंबर कसली आहे. रविवारी पहाटे बहुतेक गुन्हेगार आपापल्या घरी झोपेत असतानाच पोलिसांनी अचानक त्यांच्या घरांचे दरवाजे ठोठावले आहेत. पाच जिल्ह्यांतील 1 हजार 041 हून अधिक राऊडी शिटरच्या घरात पोलिसांनी तपासणी केली आहे.

या कारवाईत कोणतीही कागदपत्रे नसलेली 27 वाहने व 9 मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दोघा जणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी होऊनही ते न्यायालयात हजर झाले नव्हते. पोलिसांच्याही तावडीत सापडले नव्हते. तपासणीवेळी सापडलेल्या दोघा जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून या गुन्हेगारांवर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलीस दलाकडून काळ्या यादीतील गुन्हेगारांच्या घरांना वारंवार भेटी देण्याचा उपक्रम सुरूच असतो. खास करून रात्रीच्या वेळी अचानक भेट देऊन तपासणी केली जाते. रविवारी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेवरून पाच जिल्ह्यात एकाचवेळी मोहीम राबविण्यात आली आहे. गुन्हेगारी कारवाया थोपविण्यासाठी अशी तपासणी सुरूच राहणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. या मोहिमेत भाग घेतलेल्या अधिकारी व पोलिसांचे त्यांनी कौतुक पेले आहे.

जिल्हा                   कारवाई

बेळगाव                  201

विजापूर                 482

बागलकोट             117

धारवाड                46

गदग                    195

Advertisement
Tags :

.