For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | ऑपरेशन समन्वय अंतर्गत हातभट्ट्यांवर कारवाई

05:08 PM Jun 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur news   ऑपरेशन समन्वय अंतर्गत हातभट्ट्यांवर कारवाई
Advertisement
मुळेगाव तांडा येथे एक्साईज, पोलीस, वन, महावितरण विभागाची संयुक्त मोहीम

सोलापूर : ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व विक्रीचे मुख्य केंद्र असलेल्या मुळेगाव तांडा येथे एक्साईज, पोलीस, वन, महावितरण विभागाने संयुक्त धडक कारवाई करीत अनेक हातभट्ट्या उद्ध्वस्त करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व विभागांना अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री या विषयान्वये सर्व विभागांना समन्वयात्मक कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते. त्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जून रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर वनविभाग, सोलापूर महावितरण विभाग, सोलापूर ग्रामीण पोलीस, महसूल विभाग या सर्व विभागांनी समन्वयाने हात भट्टी निर्मितीचे मुख्य केंद्र असलेल्या मुळेगांव तांडा येथील हातभट्ट्यांवर कारवाई केली.

यावेळी हातभट्टीसाठी साठवून ठेवलेल्या रसायनाचे पिंप जेसीबीच्या मदतीने नष्ट करण्यात येऊन रसायन हे नाल्याच्या पाण्यामध्ये टाकण्यात आले. तर पक्क्या बांधकामात बांधण्यात आलेले हौद पाडण्यात आले.

Advertisement

हातभट्टी निर्मिती केंद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण ४२५० लि. रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण तीन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच एकूण तीन जणांवर कारवाई करुन एक लाख ६७ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या संयुक्त कारवाईमध्ये हातभट्ट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आलेले लाकूड व त्याच्या कटाईसाठी असणाऱ्या अनधिकृत सॉ मिल यांच्यावरही जप्तीची कारवाई सोलापूर वनविभाग यांनी केली.

त्यात त्यांनी आरा यंत्र-२, ग्यांडर यंत्र - ३, विद्युत मोटर -१, वजन काटे-२, लाकूडमाल साठा १६० घ.मी. असा एकूण अंदाजे ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर सॉ मिल व हातभट्ट्या यांना केवळ आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापर करतात त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण विभागाकडून चार वीज जोडण्या तोडून ४०० मीटर वायर जप्त करुन ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संयुक्त मोहिमेमध्ये ८ लाख २५ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.