आंबा घाटात रस्त्याला भेगा; अवजड वाहतूक बंद
-जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आदेश; मुसळधार पावसामुळे मोठा धोका
त. भा. प्रतिनिधी
रत्नागिरी/देवरूख
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वरील आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. रस्ता खचण्याची शक्यता असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या घाटातून जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) या मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आंबा घाट हा तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यासाठी संवेदनशील भाग आहे. सततच्या पावसामुळे आंबा घाटात रस्त्याच्या डाव्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी 100 मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अहवालात वर्तवण्यात आली होती. त्यामुळे तातडीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर (चेक पोस्ट) आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्याआहेत. तसेच, एनएचएआय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला बाधित ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक, रिफ्लेक्टीव्ह बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी ब्लिंकर्स बसवण्याचे निर्देश दिले असून रस्त्याच्या दुऊस्तीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यास सांगितले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा वाहनावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला आहे.
-अवजड वाहनांना मनाई : 31 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
-हलक्या वाहनांना मुभा : केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि हलकी प्रवासी वाहने नियंत्रित वेगाने आणि खबरदारी घेऊन या मार्गावरून प्रवास करू शकतील.
-पर्यायी मार्ग: अवजड वाहनांसाठी ‘रत्नागिरी - हातखंबा - पाली - अणुस्कुरा घाट-राजापूर/कोल्हापूर‘ हा पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आला आहे. तसेच भुईबावडा किंवा फोंडा घाटाचाही पर्याय स्थानिक प्रशासनाने सुचवला आहे.
आमदार किरण सामंत यांची घटनास्थळी पाहणी; तातडीने उपाययोजनांचे निर्देश
आंबा घाटातील रस्ता धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळताच लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आपल्या नियोजित दौऱ्यात बदल करून तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली.