गांजासह अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांचा बंदोबस्त करा
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश
समृद्धी महामार्ग भुसंपादनासाठी चौपट दराबाबत पाठपुरावा करणार
महावितरणसह क्रिडा विभागाच्या कारभारावरून अधिकारी धारेवर
कोल्हापूर
सीमा भागात गांजासह अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. त्यामुळे येथील युवक बिघडत असून याचा बंदोबस्त करावा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी सीमा भागातील अवैध व्यवसाय जोरात सुरू असल्याचे निदर्शनास आणले. विशेषत: गांजाचे प्रमाण जास्त आहे. जिह्यातील तरुण पिढी बिघडत आहे, याबाबत चिंता व्यक्त केली. याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तारखेसाठी हद्दपार गुंड येत असल्याचा खुलासा केला. आमदार आवाडे यांनी तारीख असताना सुद्धा गुंड फिरत असतात याची खबरदारी घेण्याची सूचना केली. गांजा विक्रीचे प्रमाण वाढत असल्याची खंत आमदार आवाडे यांनी व्यक्त केली. महापूर प्रश्न, मंदिर विकास आराखडे, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन, शेतकऱ्यांचा वीज, पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरील सौरप्रकल्प, विकास कामादरम्यान उकरलेले रस्ते पूर्ववत करणे, जलजीवन मिशन, ग्रामीण रस्ते यासंदर्भात आमदारांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
महावितरणसह क्रीडा अधिकारी धारेवर
आमदारांनी 91 पाणी पुरवठा योजनांना रखडलेली वीज जोडणी याबाबत प्रश्न उपस्थित केले. क्रीडा अधिकाऱ्यांबाबत तक्रारी सांगितल्या. यावेळी महावितरण अधिकारी आणि क्रीडा अधिकाऱ्यांची पालकमंत्री आबिटकर यांनी चांगलीच कानउघडणी केली. यापुढे लोकप्रतिनिधींना विचारून कामे केले जाईल, असा खुलासा अधिकाऱ्यांनी केला.
महापालिकेच्या शाळांनाही निधी मिळावा
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आधुनिकिकरण केले जात आहे. त्याच धर्तीवर महापालिकेच्या शाळांनाही निधी मिळावा, अशी मागणी राज्य नियाजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांनी केली.
भूसंपादनासाठी चौपट दर द्या
रत्नागिरी-नागपूर समृद्धी महामार्ग भूसंपादन करण्यासाठी बाजार भावाच्या दुप्पट दर दिला जात आहे. मात्र अन्य ठिकाणी चौपट दर दिला जात आहे. समृध्दी महामार्गासाठीही चौपट दर दिला जावा, अशा सूचना मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे यांनी मांडली. यावर पालकमंत्री आबिटकर यांनी विशेषबाब म्हणून यावर निर्णय घ्यावा, यासाठी यासंदर्भात प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्र्यांना दिला जाईल, असे सांगितले.
स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा
जिल्हास्तरावरून अनेक विकासकामांचे नियोजन होते, त्याला मंजुरी दिली जाते. निधीही वर्ग केला जातो. या प्रक्रियेत संबंधित तालुक्यातील आमदार व खासदार यांच्याशी समन्वय ठेवून योजनांना मंजुरी द्या. त्यांनी दिलेल्या सूचना प्राधान्याने त्या त्या योजनेत समाविष्ट करा, अशा सूचना आबिटकर यांनी दिल्या. कोणतेही नवीन कामांचे प्रस्तावही सादर करताना ते संबंधित लोकप्रतिनिधींना माहित असावेत, असेही त्यांनी सांगितले.
अंबाबाई विकास आराखडासाठी जास्तीचा निधी आणणार
करवीर निवासिनी अंबाबाई विकास आराखडा, जोतिबा विकास आराखडा, कन्व्हेंशन सेंटर आदी महत्त्वाच्या विषयांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक लावून सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी केंद्र व राज्य स्तरावरील अधिकचा निधी कसा आणता येईल, याबाबतही नियोजन केले जाईल, असे आबिटकरांनी सांगितले.