Crab Market: पावसाळ्यात खेकड्यांचा बेत, पंचगंगा काठी फुलतोय खेकड्यांचा बाजार
पावसाळा सुरु होताच खेकड्यांची मागणी झपाट्याने वाढली आहे.
By : इंद्रजीत गडकरी
कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठी, छत्रपती शिवाजी महाराज पुलाजवळच्या परिसरात सध्या खवैय्यांसाठी विशेष आकर्षण ठरलेला ‘खेकड्यांचा बाजार’ चांगलाच फुलला आहे. पावसाळा सुरु होताच खेकड्यांची मागणी झपाट्याने वाढली असून, विशेषत: काळ्या पाठीच्या खेकड्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
या खेकड्यांची विक्री सध्या 250 ते 300 रुपये किलो दराने होत आहे. खेकडे पकडण्यासाठी विक्रेते राधानगरी, कोडोली, शाहूवाडी, गगनबावडा परिसरात पहाटेपासूनच प्रयत्न करत आहेत. नदी, ओढे, डबक्यांमधून खेकडे पकडले जातात.
शहरातील, गावात जाणाऱ्यांचीही मोठी गर्दी
या बाजारात केवळ शहरातील नव्हे तर गावाकडे जाणारे नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात खेकडे घेण्यासाठी येत आहेत. शहरातील आणि ग्रामीण भागातील खवैय्येही सकाळी लवकर येथे येऊन खेकड्यांची खरेदी करत आहेत. अनेकजण खेकडे घरी घेऊन जाऊन रस्सा किंवा खेकड्याचे तळलेले पदार्थ बनवत आहेत.
पावसाळ्यात खेकड्यांचा आहार का महत्त्वाचा ?
पावसाळ्यात वातावरण बदलामुळे शरीराची झीज होते, थंडी, सर्दी आणि थकवा जाणवतो. खेकड्यांचे मांस शरीराला उब देणारे, ऊर्जा देणारे आणि पोषक असते. म्हणूनच ग्रामीण भागात तसेच कोल्हापूर शहरात पावसाळा म्हणजे खेकड्याचा खास हंगाम मानला जातो.
खेकडा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
- प्रोटिनचा समृद्ध स्रोत : स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त.
- ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स : हृदयासाठी फायदेशीर.
- झिंक, सेलेनियम व आयर्न : रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
- कॅल्शियम : हाडे आणि सांध्यांसाठी उपयुक्त.
- त्वचा व केसांचे आरोग्य राखणारे घटक.
लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हॉटेल व्यावसायिक, मासळीप्रेमी ग्राहक, आणि पारंपरिक आहारात रस असणारे नागरीक या बाजारात खूप मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. स्थानिक विक्रेत्यांना यामुळे चांगला रोजगार मिळत असून, कोल्हापुरात खेकड्याचा पावसाळी हंगाम फुललाच आहे.
खेकड्यांची मागणी खूप
"पावसाळा सुरू होताच खेकड्यांची मागणी खूप वाढते. आम्ही रोज पहाटे राधानगरी, कोडोली, शाहूवाडी जंगल भागात जाऊन खेकडे पकडतो. सकाळी बाजारात विक्रीसाठी आलो की काही तासात सगळी विक्री होते. लोकांची गर्दी बघून आनंद होतो. यंदा खेकड्यांची चव अनुभवण्यासाठी शहराबरोबरच गावाकडचे लोकही खास येत आहेत."
- जयराम गोसावी, खेकडे विक्रेते, वडणगे.