कार पेटल्याने सीपीआयचा होरपळून मृत्यू
कर्तव्य बजावून पत्नी-मुलांच्या भेटीसाठी जात असताना गदगजवळ दुर्घटना
प्रतिनिधी/ बेंगळूर
अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या सीपीआय पी. व्ही. सालिमठ (44) यांचा कारने पेट घेतल्याने होरपळून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री कर्तव्य बजावून पत्नी व मुलांच्या भेटीसाठी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. 25 नोव्हेंबर रोजी एका विवाह समारंभाला जात असताना कार उलटून झालेल्या अपघातात आयएएस अधिकारी महांतेश बिळगी मृत्युमुखी पडले होते. ही घटना विस्मरणात जाण्यापूर्वीच सीपीआय सालिमठ यांना काळाने हिरावून नेले.
धारवाड जिल्ह्यातील अण्णीगेरी शहराबाहेर शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली. हावेरी येथील मागील तीन महिन्यांपासून ते लोकायुक्त सीपीआय म्हणून सेवा बजावत होते. त्यांनी यापूर्वी बैलहोंगल येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम केले होते. शनिवारी न्यायालयात साक्ष नोंदविण्यासाठी येणार होते. त्यासाठी शुक्रवारी काम संपल्यानंतर त्यांनी गदगमध्ये पत्नी व मुलांना भेटून नंतर बेळगावला येण्याची तयारी केली होती. आपल्या आय 20 कारमधून ते गदगच्या दिशेने निघाले होते. मात्र, अण्णीगेरी शहराजवळ कारने अचानक पेट घेतला. त्यांना कारमधून बाहेर पडणे शक्य झाले नाही. काही वाटसरूंनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्नही केला. परंतु, त्यांना यश आले नाही. या घटनेची अण्णीगेरी पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कारने दुभाजकाला धडक दिल्यानंतर इंधनाच्या टाकीला धक्का पोहोचून आग लागली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच अण्णीगेरी पोलीस व इतर अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. आगीत सीपीआय पी. व्ही. सालिमठ यांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती धारवाड जिल्हा पोलीस प्रमुख गुंजन आर्य यांनी दिली.
हुबळीतील किम्स इस्पितळात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सालिमठ यांचे पार्थिव मुरगोडला नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पी. व्ही. सालिमठ हे 2003 पासून पीएसआय म्हणून पोलीस खात्यात रूजू झाले. ते मुळचे बेळगाव जिल्ह्याच्या मुरगोड येथील रहिवासी होते. कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर, सेडम येथे पोलीस निरीक्षक म्हणून नंतर गदग शहर पोलीस स्थानक आणि बैलहोंगल येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम केले होते. तीन महिन्यापूर्वी त्यांनी लोकायुक्त विभागात बदली झाली होती.