सीपीआय अल्ताफ मुल्ला यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी
बेळगाव : कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावत असलेले कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांचे निलंबन रद्द करण्यात यावे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर आरोप नसताना अचानक निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सर्वसामान्यांप्रति कर्तव्यदक्ष असणाऱ्या अल्ताफ मुल्ला यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याची मागणी कर्तव्य महिला मंडळाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला हे प्रामाणिक व जबाबदार अधिकारी आहेत. त्यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यावरील कारवाईने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सण-उत्सव तोंडावर असताना शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचा अनुभव मोलाचा ठरणार आहे. यासाठी अल्ताफ मुल्ला यांचे निलंबन रद्द करून त्यांची पुन्हा कॅम्प पोलीस स्थानकात नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी अक्काताई सुतार, शालिनी पाटील, उमा जाधव, छाया भातकांडे, संजीवनी शहापूरकर यांच्यासह मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.