For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गायींनाही येते नैराश्य

06:03 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
गायींनाही येते नैराश्य
Advertisement

नैराश्याचा झटका येणे किंवा डिप्रेशन हा विकार अलिकडच्या काळात मोठ्या  प्रमाणावर पसरु लागला आहे. कामगिरी करुन दाखविण्याचा तणाव, कौटुंबिक ओढताण, प्रत्येक क्षेत्रातली तीव्र स्पर्धा, अपयश येईल की काय, अशी भीती आदी अनेक कारणांमुळे अनेक व्यक्ती नैराश्याचा विकाराने ग्रासलेल्या दिसून येतात. हा विकार माणसांनाच होतो, अशीही समजूत आहे. तथापि, ही समजूत खरी नाही, असे नव्या संशोधनातून समोर येत आहे. गायीनांही नैराश्य येते असे काही प्रयोगांमधून दिसून आले आहे. ज्याला भावना आहेत, अशा कोणत्याची सजीवाला कमी-अधिक प्रमाणात नैराश्य येऊ शकते, असे आता गृहित धरण्यात येत आहे.

Advertisement

ब्रिटनच्या ‘नॉर्थम्टन’ विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले आहे. त्यातून असे लक्षात आले आहे, की गायींच्या कळपातून त्या आपली एक विशेष ‘मैत्रिण’ निवडतात. ती त्यांची सर्वोत्तम आणि सर्वात जवळची मैत्रिण गाय बनते. या मैत्रिणीला काही त्रास झाला, ती जखमी झाली किंवा तिला या गायीपासून अलग करण्यात आले, तर त्या अस्वस्थ होतात. त्यांच्या हालचाली मंदावतात आणि त्यांना नैराश्याचा झटका येऊ शकतो, असे संशोधिका क्रिस्टा मॅकलेनन यांचे निरीक्षण आहे. नैराश्य आले, की या गायींमध्ये त्याची लक्षणे दिसून येऊ लागतात. त्यांच्या हृदयाची धडधड वाढते. त्यांचा रक्तदाबही वाढतो. खाणेपिणे कमी होते आणि त्या घाबरल्याप्रमाणे दिसू लागतात. गायी या केवळ भावनात्मक दृष्टीने नव्हे, तर सामाजिक दृष्टीनेही संवेदनशील असतात. तसेच त्यांना मानवांप्रमाणे मैत्री, आपुलकी, मानापमान आणि इतर भावना असतात. काही गायींमध्ये या भावना तीव्र असू शकतात. अशा गायींना नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते. या संशोधनाचे प्राण्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी अनेक लाभ आहेत. भावनात्मकात हा गुण काही प्राण्यांमध्ये इतर प्राण्यांपेक्षा अधिक प्रमाणात असतो. गाय हा सर्वाधिक भावनात्मकता असणारा प्राणी असतो, असे मानण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.