अवकाशात उगवले चवळीचे कोंब
इस्रोकडून छायाचित्र जारी : 30 डिसेंबर रोजी पीएसएलव्ही-सी60 रॉकेटद्वारे पाठवल्या होत्या बिया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इस्रोने आणखी एक चमत्कार केला आहे. अंतराळात जीवसृष्टीचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. चवळीच्या बियांना अवकाशात कोंब फुटल्याचे निदर्शनास आले आहे. इस्रोने शनिवारी यासंबंधीची छायाचित्र व्हायरल करत ‘गुड न्यूज’ दिली. आता लवकरच चवळीच्या दाण्यांना छोटी-छोटी पाने देखील फुटणार असल्याचेही इस्रोने म्हटले आहे. या चवळीच्या बिया 30 डिसेंबर 2024 रोजी पीएसएलव्ही सी60 रॉकेटद्वारे स्पॅडेक्स मोहिमेवेळी पाठवण्यात आल्या होत्या.
या प्रयोगाद्वारे शास्त्रज्ञांना अंतराळात वनस्पती कशा वाढवता येतील हे समजू शकणार आहे. या अंतराळातील प्रयोगाची भविष्यातील संशोधनात मदत होणार आहे. चवळीच्या दाण्यांना अवघ्या चार दिवसात कोंब फुटले आहेत. आता बियाण्यांमधून लवकर पाने निघतील अशी अपेक्षा इस्रोने सोशल मीडियावर दिली आहे. या प्रयोगावर खूश झालेल्या इस्रोने ‘अंतराळात जीवनाची सुरुवात!’ अशी टिप्पणी केली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने 30 डिसेंबरच्या रात्री ‘स्पॅडेक्स’ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करत इतिहास रचला होता. ‘स्पॅडेक्स’ ही स्पेस डॉकिंग मोहीम प्रक्षेपित करण्यात इस्रोने यश मिळविले आहे. आतापर्यंत स्पेस डॉकिंगचे तंत्रज्ञान काही मोजक्या देशांनीच विकसित केले होते. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच हे साध्य झालेले असताना आता भारतानेही स्पेस डॉकिंगचे कौशल्य संपादन करत अवकाश क्षेत्रात नवे क्षितीज पादाक्रांत केले.
स्पेस डॉकिंग प्रणाली
‘पीएसएलव्ही-सी60’च्या माध्यमातून स्पेस डॉकिंग प्रयोगाचे प्रक्षेपण करण्यात आले असून त्याला ‘स्पॅडेक्स’ नाव देण्यात आले आहे. स्पेस डॉकिंग हे अंतराळात दोन अंतराळयानांना जोडणारे तंत्रज्ञान आहे. या पद्धतीमध्ये अंतराळ यानच आपणहून अंतराळस्थानकाशी जोडले जाऊ शकते. अंतराळात दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडण्याचे हे तंत्रज्ञान भारताला स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करणे आणि चांद्रयान-4 प्रकल्पात मदत करणार आहे. स्पेस डॉकिंग हे अंतराळ स्थानकाच्या संचालनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.