मडगावच्या एसजीपीडीए मार्केटमध्ये गोरक्षकांना मारहाण
जखमी झाल्याने इस्पितळात दाखल : बेकायदा बीफ आणल्याची चौकशी करताना घडला प्रकार
प्रतिनिधी/ मडगाव
शेजारील कर्नाटक राज्यातून बीफ आणून त्याची विक्री करण्याचे प्रकार घडत असून मडगावच्या एसजीपीडीए मार्केटात बेकायदेशीररीत्या बीफ आणल्याच्या संशयावऊन गाडीची पाहणी व चौकशी करण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांना मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. त्यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे. तर येथील विक्रेत्यांनीही गाडीच्या तपासणीसाठी आलेल्या गोरक्षकांनी तिघाजणांना मारहाण केल्याचा दावा केला आहे.
मडगाव एसजीपीडीएच्या चिकन मार्केटजवळ मटण विक्रीची दुकाने आहेत, त्या ठिकाणी ही घटना घडली. कर्नाटकामधून बीफची आयात झाल्याची माहिती मिळाल्यावऊन काही गोरक्षक चौकशीसाठी मार्केटकडे आले होते. त्यांनी येथील लोकांना गाडी दाखवण्यास सांगितले आणि नंतर मारहाणीचा प्रकार घडला. एसजीपीडीएतील तीन बीफ विक्रेत्यांना बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा विक्रेत्यांनी केलेला आहे.
एसजीपीडीएतील दुकाने बंद करत विक्रेत्यांनी तक्रार करण्यासाठी फातोर्डा पोलिस ठाणे गाठले. विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दुकान उघडण्यासाठी ते गेले असता काहीजण आले व त्यांनी गाडी खुली कऊन आत काय आहे ते दाखवण्यास सांगितले. त्यांना तुम्ही कोण अशी विचारणा करत विक्रेत्यांनी गाडी दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली व त्यांनी लोखंडी सळी काढत तिघांना मारहाण केली आहे. यात अफजल बेपारी, माजिद बेपारी, युनूस बेपारी हे तिघे जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
विक्रेत्यांना संरक्षण देण्याची मागणी
यापुढे मटण मार्केटमध्ये येणाऱ्या गाड्यांना पोलिस संरक्षण द्यावे तसेच मार्केटमध्येही पोलिस तैनात करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली. मार्केटमध्ये आणण्यात आलेले मांस हे गोवा मीट कॉम्प्लेक्समधून आणण्यात आलेले मांस आहे. हे बीफ असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. कुणाला याबाबत शंका असल्यास त्यांनी गोवा मीट कॉम्प्लेक्समध्ये जात चौकशी करावी, असेही विक्रेते म्हणाले. नाताळ सण जवळ आल्याने बीफची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कर्नाटकातून बीफ आणल्याची माहिती मिळाली
भगवान रेडकर यांनी सांगितले की, एसजीपीडीएच्या मार्केटमध्ये कर्नाटकातून बीफ घेऊन गाडी आणल्याची माहिती मिळाल्याने याची पाहणी करण्यासाठी गोरक्षक म्हणून काहीजण तिथे गेले होते. त्याठिकाणी एक गाडी रिकामी झालेली होती व दोन बंद गाड्या लपवून ठेवल्या होत्या. त्यांनी गाडीलाही हात लावला नाही. पण, ते मारण्यास येत असल्याचे पाहून ते रस्त्यावर येऊन उभे राहिले व पोलिसांकडे संपर्क साधला. त्याठिकाणी येत काहीजणांनी गोरक्षकांना मारहाण केली. यात किरण आचार्य व साई मालवणकर यांना दुखापत झालेली आहे. त्यांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे.
एसजीपीडीएतील मांस विक्रेत्यांकडूनही तिघांना मारहाण झाल्याची तक्रार फातोर्डा पोलिस स्थानकात देण्यात आलेली आहे. गोरक्षकांकडूनही मारहाणीची तक्रार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.