पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात गाय ठार
कोनशी - असनिये सिमेलगतच्या जंगलातील घटना ; वाघाच्या हल्ल्यात तीन आठवड्यात तीन गाई ठार
ओटवणे प्रतिनिधी
पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना कोनशी असनिये सीमेलगतच्या जंगलात घडली. वीस दिवसांपूर्वीही याच पट्टेरी वाघाने याच ठिकाणी अनंत काशिनाथ काळे यांच्या दोन गाई ठार करीत त्यांचा फडशा पडला होता. या जंगलात पट्टेरी वाघ ठाण मांडून असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन खात्याने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी या भागातून होत आहे.असनिये येथील शेतकरी बागायतदार रवींद्र काशिनाथ काळे हे कोनशी - असनिये सिमेलगतच्या जंगलात गुरे चरण्यासाठी घेऊन गेले होते. रवींद्र काळे काजू बागायतीत काम करत होते. पट्टेरी वाघाने गाईला लक्ष करीत हल्ला केल्यानंतर इतर गुरांनी पळ काढत रवींद्र काळे यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी एक गाय नसल्याचे समजताच रवींद्र काळे यांनी परिसरात शोधाशोध केली. त्यावेळी गाय मृतावस्थेत निदर्शनास येताच त्यांना धक्काच बसला. या घटनेची बांदा वनपाल प्रमोद सावंत व वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत पंचनामा केला. पट्टेरी वाघाच्या या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वन खात्याने याची दखल घेऊन या पट्टेरी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातून होत आहे.