महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गाय आणि संस्कृती

06:02 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वैदिक संस्कृतीमध्ये गोपालनाला विशेष महत्त्व दिलेले आहे. भगवान श्रीकृष्ण गोपाळ म्हणजे गाईचे पालन करणारा व गोविंद म्हणजे गाईना आनंद देणारा. स्वत: लहानपणी श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या सवंगड्यासमवेत वनामध्ये गाई चारण्यासाठी घेऊन जात असत आणि त्यामध्येच त्यांना आनंद प्राप्त होत असे. त्यांना गाय अतिशय प्रिय आहे. विष्णू पुराणमध्ये वर्णन येते  ॐ नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नम:।। अर्थात ‘गाय आणि ब्राह्मणांचे तसेच सामान्यत: जीवांचे हितचिंतक असलेले परम सत्य, कृष्ण यांना मी माझा आदरपूर्वक प्रणाम करतो. सर्व इंद्रियांना आनंद देणाऱ्या गोविंदाला मी वारंवार नमस्कार करतो.’  गाय आणि श्रीकृष्णांच्या लीलांचा अगदी त्यांच्या लहानपणापासूनच संबंध आहे.

Advertisement

श्रीमद्भागवतमध्ये 10 व्या स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या बालपणाच्या लीलांचे वर्णन केले आहे. कंस त्याला मिळालेल्या शापामुळे गोकुळामध्ये जाऊ शकत नव्हते, म्हणून बाळकृष्णाला ठार मारण्यासाठी अनेक राक्षसांना कंस गोकुळात पाठवत होता. एकदा पुतना नावाची राक्षसी स्तनाला विष लावून एका गोपीच्या रूपात बाळकृष्णाला ठार करण्यासाठी आली. तिला वाटले की बाळकृष्ण तिचे स्तन दूध पिण्यासाठी चोखतील आणि त्यावरील विष चोखून बाळकृष्णाचा मृत्यू होईल पण झाले उलटेच. बाळकृष्णाने सहजपणे पूतनेचा वध केला. त्यावेळी मरताना पुतना आपले विशाल स्वरूप धारण करते त्याचवेळी श्रीकृष्ण मात्र बालकाच्या रूपात तिच्या स्तनावरती खेळत राहतात. त्यानंतर त्याठिकाणाहून यशोदामाता, रोहिणीमाता आणि इतर गोपी बाळकृष्णाला उचलून घरी आणतात आणि गायीच्या शेपटीने श्रीकृष्णाची दृष्ट काढतात (भा 10.6.19)  यशोदारोहिणीभ्यां ता: समं बालस्य सर्वत: । रक्षां विदधिरे सम्यग्गोपुच्छभ्रमणादिभि:। अर्थात ‘यशोदामाता, रोहिणीमाता आणि अन्य वयस्कर गोपींनी बाळकृष्णांच्या पूर्ण रक्षणासाठी त्यांच्यावरून गोपुच्छ फिरविण्याचा विधी केला’ पुढील श्लोकामध्ये वर्णन येते की (भा 10.6.20) गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गोरजसार्भकम् । रक्षां चव्रुश्च शकृता द्वादशाङ्गेषु नामभि:। अर्थात ‘बाळकृष्णांना त्यावेळी गोमूत्राचे स्नान घालण्यात आले आणि त्यांच्या सर्वांगाला गाईच्या चरणांची धूळ माखण्यात आली, त्यानंतर, त्यांच्या बारा अंगांना भगवंताच्या बारा नावांचे उच्चारण करून गाईचे शेण लावण्यात आले. अशा रीतीने बाळांचे सर्व प्रकारे संरक्षण करण्यात आले.’ यावरून दिसून येते की वृन्दावनातील गोपींना बालकाच्या रक्षणासाठी गाईच्या शेपटाचा कसा वापर करावा हे माहीत होते. गोरक्षणामुळे मानवी समाजास अनेक सुविधा प्राप्त होतात, पण लोकांना गोरक्षणाच्या कलेचे विस्मरण झालेले आहे.

Advertisement

श्रीमद भागवतमध्ये वृंदावनमध्ये गाईची काळजी कशी घेत असत याबद्दल वर्णन आहे. (भा 10.5.7) गावो वृषा वत्सतरा हरिद्रातैलरूषिता:।

विचित्रधातुबर्हस्रग्वस्त्रकाञ्चनमालिन: । अर्थात ‘गाई, बैल आणि वासरांना हळद, विविधरंगी धातू आणि तेल यांचे मिश्र्रण लावून रंगविण्यात आले होते. तसेच त्यांना मोरपिसे, पुष्पमाळा आणि सुवर्णालंकार घालून सजविण्यात आले होते आणि त्यांच्या पाठीवर भरजरी वस्त्रांच्या झुली घालण्यात आल्या होत्या.’ भगवान श्रीकृष्ण स्वत: भगवद्गीतेमध्ये सांगतात (भगी 18.44) कृषिगोरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् । कृषी, गोरक्षण आणि व्यवसाय ही वैश्यांची कार्ये होत. भगवान श्रीकृष्णांचे वडील नंद महाराज हे स्वत: वैश्य अर्थात शेतकरी होते. गोरक्षण कसे करावे आणि वैश्य समाज कसा ऐश्वरशाली होता याचे वर्णन वरील श्लोकात येते. दुर्दैवाने कलियुगात शेतीकडे आणि गोपालनाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी खूप दु:खी दिसतात, कर्जबाजारी होतात आणि विनाकारण आत्महत्या करतात, घरेही पडक्मया अवस्थेमध्ये असतात. भगवान श्रीकृष्ण जसे 7 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे नंद महाराजांनी गाई सांभाळण्याचे कार्य दिले. नंदमहाराजांकडे लाखो गाई होत्या. पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीकडे किती गाई आहेत आणि किती धान्यसाठा आहे यावरून त्यांची श्रीमंती गणली जात असे. गाई व धान्य माणसांच्या आणि पशूंच्या अन्नाच्या मूलभूत गरजा भागवू शकतात. या दोन गोष्टींव्यतिरिक्त इतर ज्या काही कृत्रिम गरजा माणसाने निर्माण केल्या आहेत त्या केवळ वेळेचा अपव्यय आहे. त्यामुळे समाजातील मानसिक स्वास्थ्यही बिघडून गेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी मानवीय समाजासाठी आदर्श शिक्षक म्हणून दाखवून दिले की, आपण गाईंची काळजी कशी करावी. गाय ही मानवांसाठी ‘आई’ प्रमाणे आहे. मनुष्य जन्म झाल्यानंतर केवळ काही महिनेच आईचे दूध पितो पण आयुष्यभर गाईचे दूध पितो, म्हणून गाय ही मानवांसाठी ‘आई’ आहे  ‘बैल’ हा पित्याप्रमाणे आहे, कारण तो धान्य पिकविण्यासाठी शेतात आपल्यासाठी राबतो. म्हणून गाई-बैलाची हत्या करणे म्हणजे आपल्या आईवडिलांची हत्या करण्यासारखे आहे. मानवी शरीराच्या परिपूर्ण वाढीसाठी गाईच्या दुधाची नितांत आवश्यकता असते. विशेषत: गाईच्या दुधामुळे मेंदूतील सूक्ष्म उतींची (िग्ही tग्ssले) वाढ होते, ज्याद्वारे मनुष्य ज्ञान, विशेषत: आध्यात्मिक ज्ञान समजू शकतो.

वैदिक संस्कृतीमध्ये आणि आजही भारतामध्ये गोमूत्र आणि गोशेण पवित्र मानले जाते. अनेक धर्मकार्यामध्ये त्याचा शुद्धीकरणासाठी उपयोग केला जातो. जर आपण विष्ठेला अथवा मूत्राला स्पर्श केला तर आपल्याला पुन: शुद्धी करावी लागते पण एखादी अपवित्र जागा, यज्ञस्थळी गोशेणाने आणि मूत्राने शुद्ध करता येते. कलकत्यामध्ये एका डॉक्टर-वैज्ञानिकांनी गाईच्या शेणाचा तपास केला तेव्हा त्यांना आढळले की गाईचे शेण रोगनिरोधक (अँटीसेप्टीक) आहे. इतर कोणत्याही प्राण्याच्या विष्ठेला पवित्र मानलेले नाही. जर पुरेसे दूध, दही, तूप, मध, अन्नधान्ये रत्न-दागिने असतील तर भौतिक जगातील दु:ख नाहीसे होईल. शेतीद्वारे आपण अन्नधान्य उत्पादन करू शकतो. तर गोरक्षेद्वारे दूध, दही व तूप प्राप्त होते.

संत तुकाराम रामराज्य म्हणजे काय याचे वर्णन करताना म्हणतात झाले रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हशी ।। अर्थात ‘सर्वत्र आता रामराज्य आले आहे  त्यामुळे आम्हाला कसली कमतरता आहे. धरणी भरपूर पीक देत आहे आणि गाईम्हशीं भरपूर दूध देत आहेत.” महाराज दिलीप ह्यांनीही  नंदिनी गाईची सेवा केली होती. ते स्वत: गाई चारण्याचे काम करीत होते. नंदिनी गाय त्यांच्यावर प्रसन्न होऊन म्हणाली न केवलां पयसा प्रसूतीम-वे हि मां काम दुधा प्रसन्नम अर्थात ‘जर मी प्रसन्न झाले तर मी सर्व कामनांची पूर्ती करेन, मला केवळ दूध देणारी गाय समजू नका.” गाईंमध्ये सर्व देवतांचा वास असतो. ती कामधेनू आहे. सर्व नक्षत्र आणि किरणांना ती ग्रहण करणारी आहे. त्यामुळे सर्वांचा प्रभाव तिच्यावर असतो. जिथे गोमाता असेल तिथे नक्षत्रांचा वास असतो व त्यामुळे सर्व देवतांची कृपा होते. गोमाताच एकमेव अशी आहे जिच्या पाठीवर हाडांमध्ये सूर्यकेतू नाडी असते म्हणून दूध, लोणी आणि तूप ह्यामध्ये सुवर्णाचा अंतर्भाव असतो याचे कारण असे की सूर्यकेतू नाडी सूर्याच्या किरणांद्वारे रक्तामध्ये स्वर्णक्षार तयार करते, तोच स्वर्णक्षार गौरसामध्ये आहे. ज्या ठिकाणी संपत्ती व शक्ती गोरक्षणासाठी वापरली जात नाही त्या राज्याचा व घराचा त्यांच्या कर्मानेच नाश होतो. याउलट गोरक्षणाने परिपूर्ण मानवी संस्कृती निर्माण होते.

                                                -वृंदावनदास

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article