For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कव्हर ड्राईव्ह : भारतीय संघाचा विजयाचा श्री गणेशा

06:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कव्हर ड्राईव्ह   भारतीय संघाचा विजयाचा श्री गणेशा
Advertisement

हीविश्वचषक स्पर्धा अमेरिकेत होतेय. अजूनही ही गोष्ट मला स्वप्नवत वाटते. काल भारत विऊद्ध आयर्लंड सामना बघताना मी स्वत:ला चिमटे घेत होतो. आठ दिवसात सर्कशीचा एखादा तंबू ठोकावा, आणि महिनाभर प्रेक्षकांचे मनोरंजन करायचं तसेच काहीसे चित्र आपल्याला अमेरिकेत विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतेय. ही विश्वचषक स्पर्धा भारतासाठी हटके आहे. नोव्हेंबर 2023 मधील विश्वचषक स्पर्धेत चाबूक परफॉर्मन्स देऊन सुद्धा अंतिम सामन्यात नशीब ऊसले हे आपण पाहिलंच. अर्थात तिथूनच या सामन्याला सुऊवात होते असं म्हटलं तर वावगे ठरू नये. अर्थात फरक एवढाच की तो 50 षटकांचा होता हा 20 षटकांचा. कालचा सामना भारताच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा होता. कालच्या सामन्यात भारताला दणदणीत विजय अपेक्षित होता आणि नेमकं घडलंही तसंच कारण याच मैदानातून आपले सुपर एटचे दरवाजे उघडणार आहेत. आयर्लंडविऊद्धच्या विजयाची शिदोरी घेऊन पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविऊद्ध आपल्या नऊ तारखेला लढायचे आहे.

Advertisement

आयर्लंड आपल्याला धूळ चारेल का? अशी शंकेची पाल मनात चुकचुकत होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाकिस्तानला पराभूत केलं होतं. मागील 25 टी-20 सामन्यापैकी 13 सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता. परंतु ही आकडेवारी फक्त कागदावरच राहिली. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील पहिलं प्रेम, पहिला पगार याबद्दल जेवढं अप्रूप असतं तेवढेच अप्रूप विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतील पहिल्या सामन्याबद्दल असते. भले संघ नवखा असला तरी थोडासा दबाव हा निश्चितच असतो. रोहित शर्माने नाणेफेक जिंकत आयर्लंडला पहले आप म्हणण्यात धन्यता मानली. अर्थात त्याला नियतीनेसुद्धा ‘मम’ म्हटलं. रोहितने घेतलेला निर्णय हा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरवला तो वेगवान गोलंदाजांनी. बलबर्नी व स्टर्लिंग ही जोडी पूर्णत: अपयशी ठरली. ज्या जोडीवर भरोसा होता त्याच जोडीने आयर्लंडचा विश्वासघात केला. हार्दिक पंड्याबद्दल आपण प्रश्नचिन्ह निर्माण करत होतो. बघता बघता आयर्लंडची मधली फळी कापली ती हार्दिक पंड्याने. आयपीएलमध्ये प्रेक्षकांच्या हुर्योला सामोरे जावं लागलं होतं, त्याच हार्दिकने कमाल केली. आयपीएलमधील सुमार कामगिरीच्या टीकेला पंड्याने रोखठोक उत्तर दिले. यालाच क्रिकेट म्हणतात. हा सामना सुरू होण्याअगोदर नवज्योत सिंग सिद्धूने हार्दिकबद्दल सकारात्मक उद्गार काढले होते. आणि उद्गार तंतोतंत खरे ठरले. हा सामना विश्व कपमधील होता की क्लब सामना होता, हा प्रश्न क्षणभर पडला होता. पहिल्याच सामन्यात खेळपट्टीचा अचूक फायदा उचलला तो आपल्या मध्यमगती गोलंदाजांनी. छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी कुठलीच चूक केली नाही. आणि बघता बघता भारतीय संघाने आयर्लंडला धूळ चारली. भारतीय संघाच्या वेगवान माऱ्यासमोर आयर्लंडचा पूर्णत: पालापाचोळा झाला. एकंदरीत जे अपेक्षित होतं तेच नेमकं झालं. मिशन अमेरिकेची सुऊवात अतिशय छान झाली आहे. एकंदरीत अमेरिकेतील या खेळपट्टीवर फलंदाजांची कसोटी लागणार आहे. शेवटी तुम्ही नवखेच आहात आणि नवखेच राहा हे भारतीय संघाने ठणकावून सांगितले. भारताची सुऊवात अतिशय छान झाली आहे. सुऊवातीपासूनच भारतीय संघाने आयर्लंडच्या संघाला जनरल वॉर्डमधून आयसीयूमध्ये ढकलले. त्या आयसीयूमधून आयर्लंड संघ कधी बाहेर येणार तो येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी भारतीय संघाचे अभिनंदन !

विजय बागायतकर

Advertisement

Advertisement
Tags :

.