चुलत भावावरच जडले प्रेम !
कुटुंबामध्ये काही नाती अशी असतात, की ज्यांच्यात विवाहसंबंध होणे हे नियमबाह्या मानले जात आहे. बहीण आणि भाऊ हे असे एक नाते आहे. सख्ख्या किंवा चुलत बहिणीचा भावाशी विवाहसंबंध ही कल्पनाच आपण करु शकत नाही. संस्कृती आणि समाजाचे नियम अशा संबंधांना मान्यता देत नाहीत. अत्यंत पुढारलेल्या देशांमध्येही सख्ख्या किंवा चुलत भावडांमध्ये प्रेमसंबंध किंवा विवाह होत नाहीत. अजाणतेपणी, म्हणजेच आपण अशा प्रकारचे बहीण-भाऊ आहोत, हे काही कारणांमुळे माहीत नसेल तरच कर्मधर्मसंयोगाने असे प्रेमसंबंध किंवा विवाह होऊ शकतात. काही कुटुंबांमध्ये मामेभाऊ किंवा मामेबहिणीशी विवाह होतात. पण अशी उदाहरणेही तुलनेने कमीच असतात, असे दिसून येते.
तथापि, सध्या सोशल मिडियावर अशा एका संभाव्य विवाहाची चर्चा रंगली आहे. एक 26 वर्षीय युवती आपल्या चुलत भावाच्या प्रेमात पडली आहे आणि त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. या युवतीने तशी पोस्ट सोशल मिडियावर प्रसिद्ध केली असून ती अनेक लोकांनी पाहिली आहे. या भावंडांच्या मातापित्यांचा आणि इतर नातेवाईकांचा या विवाहाला विरोध आहे. समाजाच्या आणि कुटुंबाच्या नितीनियमांमध्ये हे संबंध बसत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.
तथापि, ही चुलत भावंडे मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांच्या संदेशांवरुन दिसून येत आहे. चुलत भावाशी किंवा बहिणीशी विवाह करणे कायद्याच्या दृष्टीने अवैध नाही. त्यामुळे कुटुंबाचे किंवा समाजातील इतर संबंधितांचे मत काहीही असले तरी, आम्हाला या विवाहात काहीच वावगे वाटत नाही. हा आमच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. कुटुंबिय किंवा अन्य कोणी त्यात हस्तक्षेप करु शकत नाहीत, असे या दोघांचे म्हणणे त्यांनी सोशल मिडियावर मांडले आहे.
लोकांनीही यावर आपली विविध मते व्यक्त केली आहेत. अनेकांच्या मते असे विवाह होऊ नयेत. कारण त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडण्याचा धोका असतो. तसेच इतक्या जवळच्या नात्यात विवाह झाले तर अशा विवाहातून निर्माण होणारी पुढची पिढी सुदृढ असत नाही, असेही मत अनेक जाणकारांनी नोंदविले आहे. आपण पुष्कळशा बाबींसाठी समाजावर अवलंबून असतो. त्यामुळे समाजाने घालून दिलेल्या दंडकांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते, असेही काहींनी बजावले आहे.