थायलंड पंतप्रधानांवर न्यायालयाकडून कारवाई
कंबोडियाच्या नेत्यासोबतचे संभाषण शिनावात्रा यांना भोवले : आता उपपंतप्रधान सांभाळणार देशाची धुरा
वृत्तसंस्था/ बँकॉक
थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने पंतप्रधान पाइतोंग्तार्न शिनावात्रा यांना त्यांच्या पदावरून निलंबित केले आहे. शिनावात्रा यांनी कंबोडियाचे नेते हुन सेन यांच्याशी फोनवर बोलताना थायलंडच्या सैन्याच्या कमांडरवर टीका केल्याचा आरोप आहे. हा प्रकार थायलंडमध्ये गंभीर मानला जातो, कारण तेथे सैन्याचा अत्यंत मोठा प्रभाव आहे.
हुन सेन अन् शिनावात्रा यांच्यात फोन कॉलदरम्यान झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग समोर आल्यावर थायलंडमध्ये संताप पसरला होता. न्यायालयाने 7 विरुद्ध 2 अशा मतांच्या फरकाने शिनावात्रा यांना पंतप्रधान पदावरून निलंबित केले आहे. शिनावात्रा यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी केली जाईल. जर त्या दोषी आढळल्या तर त्यांना कायमस्वरुपी पदावरून हटविले जाऊ शकते असे न्यायालयाने म्हटले आहे.
पंतप्रधानांनी स्वत:च्या विरोधातील नैतिकतेच्या उल्लंघनाचे प्रकरण स्वीकारले असून आता चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पंतप्रधान पदावर काम करू शकणार नाहीत. जोपर्यंत याप्रकरणी अंतिम निर्णय येत नाही तोवर उपपंतप्रधान फुमथन वेचायाचाई हे सरकार चालविणार आहेत.
कंबोडियासोबत झालेल्या सीमा वादाला हाताळण्यासाठी वाढत्या असंतोषाचा सामना शिनावात्रा यांना करावा लागत आहे. यात 28 मे रोजी झालेल्या सशस्त्र संघर्षाची पार्श्वभूमी असून यात एक कंबोडियन सैनिक मारला गेला होता. सीमा वादावरील कूटनीतिक पुढाकारादरम्यान कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याने शिनावात्रा यांच्या विरोधात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. शिनावात्रा यांच्या विरोधात बँकॉकमध्ये तीव्र निदर्शने सुरू झाली आहेत.
सहकाऱ्यांनी सोडली साथ
कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याने शिनावात्रा सरकारवर मोठा दबाव आला आहे. सत्तारुढ आघाडीतील एका मोठ्या घटकपक्षाने पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे ही आघाडी राजकीयदृष्ट्या कमकुवत ठरली आहे. माझी टिप्पणी केवळ वाद सोडविण्यासाठी होती, असे स्पष्टीकरण देत पाइतोंग्तार्न यांनी देशवासीयांची माफी मागितली आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेचा सन्मान करणार आहे, परंतु मी चिंतेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचदरम्यान पाइतोंग्तार्न विरोधात भ्रष्टाचार आयोगाही चौकशी करत आहे, यामुळे त्यांना पदावरून हटविण्याचा धोका आणखी वाढला आहे. तर फोन कॉल रेकॉर्डिंगमुळे मी देशाचे कुठलेच नुकसान केले नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा शिनावात्रा यांनी केला आहे.
राजाकडून मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी
तर थायलंडच्या राजाने त्यांच्या मंत्रिमंडळातील बदलाला मंजुरी दिली आहे. नव्या फेरबदलात काही जुन्या मंत्र्यांना हटवून नव्या सदस्यांना सामील करण्यात आले आहे. याचदरम्यान पाइतोंग्तार्न यानी स्वत:ला संस्कृती मंत्री केले आहे. थायलंडच्या संस्कृतीला जगभरात ओळख मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.