लुथरा बंधूंचा जामीन न्यायालयाने फेटाळला
पणजी : म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. लुथरा बंधूंची याआधी जामिनावर सुटका होण्याबाबत सत्र न्यायालयातही पदरी निराशाच पडली आहे. कांदोळी आरोग्य केंद्राशी संबंधित बनावट ना हरकत दाखला (एनओसी) प्रकरणाच्या संदर्भात, म्हापसा न्यायालयाने गौरव आणि सौरभ लुथरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबचे दिल्लीस्थित मालक असलेल्या या दोघांवर, आपला क्लब चालवण्यासाठी कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बनावट ‘एनओसी’ वापरल्याचा आरोप आहे. 6 डिसेंबर 2025 रोजी हडफडे येथील या क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांच्या मृत्यूच्या घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या तपासकामात सापडलेली ही कथित बनावट कागदपत्रे एका व्यापक फौजदारी तपासाचा भाग आहेत. याच ‘एनओसी’ बनावटगिरी प्रकरणात यापूर्वी सह मालक आणि आरोपी क्रमांक एक असलेल्या अजय गुप्ता यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.