For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतमोजणीनंतरच मनपाच्या न्यायालयीन कामकाजाला गती

06:05 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतमोजणीनंतरच मनपाच्या न्यायालयीन कामकाजाला गती
Advertisement

कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी यांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा निवडणूक आणि न्यायालयाला सुटी असल्याने महानगरपालिकेचे खटले जिल्हा न्यायालयाबरोबरच उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. या दोन्ही कारणांनी महानगरपालिकेतील कायदा विभागातील कामे प्रलंबित राहिली आहेत. लोकसभेच्या निकालानंतरच त्याला गती येणार असून निश्चितच प्रलंबित असलेले खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती महानगरपालिकेचे कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी यांनी दिली.

Advertisement

गोवावेस पेट्रोलपंप, रामकी कंपनीचा दावा, अनेक बेकायदेशीर बांधकामे, अनेकांनी बेकायदेशीररित्या घेतलेला कब्जा, अतिक्रमण, कर भरण्यास चुकवेगिरी केलेल्या व्यावसायिकांचे खटले प्रलंबित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी सारेच कर्मचारी त्याठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे इतर कामांकडे लक्ष देणे अवघड झाले आहे. यातच न्यायालयाला एक महिना सुटी आहे. 27 मे पासून न्यायालयीन कामकाज पूर्ववत होणार आहे. त्यामुळे जूननंतरच या कामांना गती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयीन प्रक्रिया किचकट असते. त्यामध्ये वेळ अधिक जातो. तरीदेखील महानगरपालिकेच्यावतीने जास्तीतजास्त खटले निकालात काढण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निश्चितच येत्या काही महिन्यांमध्ये विविध खटल्यांचा निकाल लागेल आणि महानगरपालिकेला त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. धारवाड उच्च न्यायालयाबरोबरच बेंगळूर येथील न्यायालयाकडेही काही खटले प्रलंबित आहेत. त्या खटल्यांसाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे खटल्यांचा निकाल लवकरच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.