कोरटकरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
कोल्हापूर :
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देवून पसार असणाऱ्या प्रशांत कोरटकरला उच्च न्यायालयाने आज (मंगळवारी) न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. कोरटकरला 11 मार्च पर्यंत जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामिन मंजूर केला होता. यावर जुना राजवाडा पोलिसांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. याची सुनावणी सोमवारी न्यायाधीश राजेश पाटील यांच्यासमोर झाली. आज मंगळवारी पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची ऑडीओ क्लीप बाहेर आल्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, सोबतच नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर कोरटकर अटकेच्या भितीने पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची दोन पथके नागपुरला रवाना झाली होती. मात्र कोरटकरने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेऊन 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळवला. याविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून त्याचा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. यावर सोमवारी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी कोरटकर याच्या अटकेची गरज असून, त्याच्या आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोरटकरने स्वत: किंवा वकिलांकरवी मंगळवारी न्यायालयात हजर राहावे, अशी नोटीस न्यायाधीशांनी बजावली. नागपूर पोलिसांमार्फत ही नोटिस बजावण्यात येणार आहे.
- आज पुन्हा सुनावणी
जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकरच्या जामिनावर हायकोर्टात धाव घेतली आहे. यावर सोमवारी सुनावणी झाली असून, मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. कोरटकर याच्या जामिनावर आज पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपत आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयातही आज सुनावणी होईल. दोन्ही न्यायालयातील सुनावणीमध्ये कोरटकरच्या जामिनाचा फैसला होणार आहे.
- फॉरेन्सिक विभाग वेटिंगवर
इंद्रजीत सावंत यांच्या फोनचे आणी सावंत कोरटकर याच्या संभाषणाची क्लिप फॉरेन्सिक विभागाने ताब्यात घेतले आहेत. त्याचसोबत फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनी इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाची तपासणी केली आहे. कोरटकर याच्या अटकेनंतर त्याच्या आवाजाचे नमुने घेतले जातील. त्यानंतर दोघांच्या संवादाचे प्रात्यक्षिक घेतले जाईल. स्वर, बोलण्याची पद्धत, आवाजातील चढ-उतार याचे शास्त्राrय विश्लेषण करून आवाजाची पडताळणी केली जाणार आहे.