येळ्ळूर खटल्यात दोन अधिकाऱ्यांना न्यायालयाचे बॉडीवॉरंट
बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणी चार खटल्यांची मंगळवार दि. 4 रोजी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुनावणी झाली. यापैकी खटला क्र. 125 मध्ये गुन्हा दाखल अधिकारी आणि तपास अधिकारी सातत्याने गैरहजर राहिल्याने, तसेच समन्स बजावूनही सुनावणीला हजर न झाल्याने न्यायालयाने दोन अधिकाऱ्यांना बॉडीवॉरंट बजावले आहे. येळ्ळूर गावच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य हा फलक 26 जुलै 2014 रोजी हटविण्यात आला होता. त्यामुळे मोठी तणावाची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे सात गुन्हे दाखल केले होते. यापूर्वी दोन खटल्यांचा निकाल लागला असून संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर उर्वरित पाच खटल्यांची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी खटला क्र. 122/15, 125/15, 126/15 आणि 306/15 या खटल्यांची सुनावणी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात झाली.
खटला क्र. 122 मध्ये सुरेश मारुती मेलगे आणि भीमाप्पा बसवाणेप्पा हंपण्णवर हे साक्षीदार वारंवार सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना या खटल्यातून वगळले. खटला क्र. 306/15 मध्ये लगमाप्पा भरमाप्पा माळगे, मल्लाप्पा फकिरप्पा माळगे या दोघाही साक्षीदारांना न्यायालयाने वगळले आहे. या खटल्यात दि. 10 फेब्रुवारी रोजी आरोपींची साक्ष नोंदविली जाणार असून सर्व 39 जणांनी सुनावणीला हजर रहावे, असे आवाहन वकिलांनी केले आहे. त्याचबरोबर खटला क्र. 126 ची सुनावणी यावेळी झाली. खटला क्र. 125 मध्ये तत्कालिन साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुन्हा दाखल अधिकारी एस. डी. नाईक, तत्कालिन तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक एच. शेखराप्पा हे सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने दोघांनाही बॉडीवारंट बजावले आहे. खटला क्र. 122, 125 आणि 126 यांची पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार असून खटला क्र. 306 सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. संशयितांतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शाम पाटील काम पहात आहेत.