विवाहासाठी जोडप्यांना मिळतेय रोख रक्कम
चीनमध्ये शासकीय अधिकारी येऊन देत आहेत पैसे
एकेकाळी चीनमध्ये केवळ एकच मूल जन्माला घालण्याची कायदेशीर अनुमती देण्यात आली होती. अनेक वर्षांपर्यंत चीनमध्ये दुसरे अपत्य जन्माला घालण्याची अनुमती नव्हती. परंतु आता तेथील स्थिती बदलून गेली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकारी युवांना विवाह करणे आणि अपत्यांना जन्म देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहित करत आहेत. परंतु तेथील लोक अपत्याला जन्म देणे तर दूरच विवाह देखील करू इच्छित नाहीत. यामुळे चीनमध्ये जन्मदर खालावला आहे. कमी मुले जन्माला येत असल्याने चीनच्या लोकसंख्येवरही प्रभाव पडत आहे. एकीकडे मोठी लोकसंख्या वृद्ध होत असून दुसरीकडे चीनकडे काम करण्याजोग्या लोकांची संख्या कमी होत आहे.
याचमुळे चीनच्या प्रशासनाने गंभीर पावले उचलली आहेत. चीनमध्ये आता विवाहाची नोंदणी केल्याच्या काही वेळातच प्रशासकीय अधिकारी घरी पोहोचून नवदांपत्यांना रोख रक्कम देत आहेत. झांग गँग आणि वेंग लिनबिन नावाच्या जोडप्याला चिनी सरकारकडून विवाहाच्या बदल्यात नोटांचे बंडल देण्यात आले आहे. चीन सरकारकडून या जोडप्याला 1500 युआन म्हणजेच 200 डॉलर्स दिले आहेत. चीनच्या अनेक प्रांतांमध्ये स्थानिक अधिकारी लोकांना विवाह करण्यासाठी प्रोत्साहित करत त्यांना रोख रक्कम देत आहेत.
घटतेय लोकसंख्या
2024 या सलग तिसऱ्या वर्षी चीनची लोकसंख्या कमी झाली आहे. चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या आता भारतापेक्षा कमी झाली आहे. चिनी जोडप्याला विवाहाच्या बदल्यात जी रोख रक्कम देण्यात आली, ती लुलियांग शहरातील लोकांच्या निम्म्या पगाराइतकी आहे. हे धोरण वर्तमान वैवाहिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल असे माझे मानणे असल्याचे झांग या इसमाने म्हटले आहे.