रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार
बेंगळूर : रेड सिग्नल पडल्यामुळे थांबलेल्या दुचाकीला रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा बेंगळूरच्या शांतीनगरमधील डबल रोडवरील संगीता सिग्नलजवळ घडली. इस्माईल (वय 40) आणि त्यांची पत्नी समीन बानू अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. जखमी सिद्दीकीसह दोघांना स्थानिक ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रिचमंड सर्कल दिशेकडून वेगाने येणाऱ्या ऊग्णवाहिकेने मागून दुचाकीला धडक दिली. तसेच दुचाकीला 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. शेवटी ऊग्णवाहिका पोलीस चौकी आणि सिग्नल कंट्रोल युनिटला धडकून थांबली. हा अपघात एका खासगी रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या चालकामुळे झाला. तसेच ऊग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नव्हता. मात्र, तो वेगाने येऊन सिग्नल असूनही ब्रेक लावला नाही. या भागात ऊग्णवाहिकेचा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. या घटनेनंतर रुग्णवाहिका चालकाने पलायन केले आहे.