For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशाची नवीन पॉवर लिस्ट : कोण पुढे? कोण मागे? कोण गायब?

06:22 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशाची नवीन पॉवर लिस्ट   कोण पुढे  कोण मागे  कोण गायब
Advertisement

एका राष्ट्रीय वर्तमानपत्राने देशातील 100 सर्वाधिक शक्तिशाली व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. ती किती बरोबर अथवा चूक हे ज्याचे त्याने ठरवावे. त्यात सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन केले गेले आहे असे कोणाला वाटेल तर अगदी वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढले आहेत असा कोणाचा कयास असेल. पण त्या वर्तमानपत्राचे आकलन ध्यानात घेतले तर देशाचे राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण कोठे चालले आहे याची एक वेगळीच झलक बघायला मिळते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही यादी प्रसिद्ध झाल्याने तिला एक आगळे महत्त्व आहे. ‘हम कहाँ जा रहे हैं’ हे त्यातून दिसते आहे असे देखील कोणाला वाटेल.

Advertisement

बरोबर अथवा चूक पण विरोधी पक्षांची हालत चांगलीच खराब आहे असे या यादीवरून साफ दिसते कारण गैरभाजप नेत्यात पहिला क्रमांक लागलेल्या ममता बॅनर्जींचे स्थान या यादीत 15 वे आहे तर राहुल गांधी सोळावे आहेत. अरविंद केजरीवाल 18 वे तर सिद्धरामय्या 22 वे, तर एम के स्टालिन हे 25 वे आणि सोनिया गांधी 29 व्या आहेत. राजकारणात अजून फारसे दिवे लावू न शकलेल्या प्रियांका गांधी वद्रा या 63 व्या स्थानावर फेकल्या गेल्या आहेत. तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांना या यादीत स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रापुरते बघायचे झाले तर कधी 23व्या तर कधी 57व्या स्थानावर असलेले शरद पवार हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 94 पर्यंत खाली घसरले आहेत आणि फक्त या यादीत टिकून राहिले आहेत इतकेच. तीच गोष्ट 95व्या स्थानावर असलेल्या उद्धव ठाकरे यांची. गमतीची गोष्ट अशी की या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 48वे, देवेंद्र फडणवीस हे 50वे तर अजित पवार हे 76वे आहेत. काळाचा महिमा अगाध हेच खरे.

दशकापूर्वी भाजपचे अध्यक्ष राहिलेले आणि मोदी सरकारातील सर्वात कार्यक्षम मानले जाणारे ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना या यादीत कोठेच स्थान मिळाले नाही हे बदलत्या काळाचे द्योतक आहे की त्यांच्याकरता धोक्याची घंटा आहे हे येणारा काळ दाखवेल. भाजपने 195 जणांची लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर केली त्यात गडकरी यांचे नाव नसल्याने शंकेची पाल अगोदरच चुकचुकली होती. त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलेले आहे ते येत्या महिन्यात स्पष्ट होणार आहे.

Advertisement

मोदी अथवा शहा यांच्याजवळ असल्याने राष्ट्रीय राजकारणात अथवा केंद्रीय मंत्री मंडळात वा मुख्यमंत्री या नात्याने स्थान मिळालेले बरेच नेते या यादीत आहेत. त्यात पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, हरदीप सिंग पुरी, मनसुख मांडवीया, अनुराग ठाकूर, मनोहर लाल खट्टर तसेच कालपर्यंत फारसे ज्ञात नसलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा समावेश होतो. राष्ट्रीय राजकारणात भाजप धार्जिणे दिसणारे आंध्र प्रदेशचे जगन मोहन रे•ाr आणि ओडिशाचे नवीन पटनाईक हे मुख्यमंत्री या यादीत आहेत. पलटू राम म्हणून कुप्रसिद्ध झालेले बिहारचे नितीश कुमारदेखील या यादीत आहेत. तसेच दिल्लीचे नायब राज्यपाल या नात्याने केजरीवाल सरकारला रात्रंदिवस धारेवर धरणारे विनय कुमार सक्सेना यांनादेखील एक शक्तिशाली नेता म्हणून मान्यता दिली गेली आहे.

देशाच्या राजकारणात विरोधी पक्षांना नाहकच सळो की पळो करत आहेत असे वरचेवर आरोप होत असलेल्या एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी) चे प्रमुख राहुल नवीन हे या यादीत 30व्या स्थानावर आहेत हे उल्लेखनीय. पंतप्रधानाचे प्रधान सचिव या नात्याने देशातील सर्वात

पॉवरफुल नोकरशहा मानले जाणारे पी के मिश्रा या यादीत वरच्या स्थानावर आहेत. मोदी सरकारात मिश्रा यांचे स्थान भल्याभल्या मंत्र्यापेक्षा मोठे आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच राहिलेली आहे. सॉलिसिटर जनरल या नात्याने सरकारची बाजू न्यायालयात हिरीरीने मांडणारे तुषार मेहता हे देखील या यादीत आहेत हे उल्लेखनिय आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच रिझर्व्ह बँकेचे प्रमुख शक्तिकांत दास हे साहजिकच शक्तिशाली आहेत.

गैरकाँग्रेस नेत्यात पहिल्यांदाच तिसऱ्या टर्मसाठी लढण्याचा विक्रम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थातच या यादीत प्रथम आहेत तर दुसरे स्थान हे गृहमंत्री अमित शहा यांनी मिळवले आहे. मोदींच्या नेतृत्वाने एकप्रकारे झाकोळून गेलेले आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे तिसऱ्या स्थानावर आहेत. हे एकप्रकारे आश्चर्यच आहे. नेहमी प्रकाशझोतात असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे 4 थ्या स्थानावर आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये पुढील सरन्यायाधीश बनत असलेले न्यायमूर्ती संजीव खन्ना देखील या यादीत समाविष्ट आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे राजकीय क्षेत्रात लाईटवेट मानले जात असले तरी जागतिक मंचावर देशाचा प्रभावी आवाज म्हणून ओळखले जात असल्याने या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. तर हिंदुत्वाचा पोस्टर बॉय समजले जाणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सहावे आहेत.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात ज्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना योगींनी निस्तेज केले आहे ते सातवे आहेत. 10-15 वर्षांपूर्वी भाजपमध्ये येऊनही ज्यांचे सितारे बुलंद झाले आहेत अशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 8व्या स्थानावर आहेत. स्वत:ला मोदी-शहा यांच्याप्रमाणे शक्तिशाली समजणारे भाजप अध्यक्ष जे पी न•ा हे नववे आहेत.

एकेकाळी स्वत:ला सोनिया गांधीपेक्षा मोठ्या नेता समजणाऱ्या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसप नेत्या मायावती या यादीतून गायब आहेत तर राज्यातील त्यांचे राजकीय वैरी अखिलेश यादव मात्र या यादीत झळकत आहेत. यादव यांच्या समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशात काँग्रेसबरोबर निवडणूक समझोता केलेला आहे. घराणेशाहीचा वाद देशाच्या राजकारणात न संपणारा आहे. या यादीत सोनिया गांधी आणि त्यांची दोन्ही मुले आहेत, तसेच अमित शहांबरोबर त्यांचा मुलगा जय शहा देखील आहे. तो क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा सेक्रेटरी आहे. उद्योगपती मुकेश अंबानी तसेच त्यांच्या पत्नी नीतादेखील या यादीत आहेत. गौतम अदानी हे 10 व्या स्थानावर असून उद्योगपतीमध्ये या यादीत पहिले आहेत त्यांच्या पाठोपाठ मुकेश आहेत. त्यांच्या पत्नी नीता देखील या यादीत झळकत आहेत.

‘जवान’ आणि ‘पठाण’ च्या जोरदार यशामुळे शाहरुख खान या यादीत 27व्या स्थानावर आघाडीवर आहे तर बॉलीवूडचे ‘शहेनशहा’ समजले जाणारे अमिताभ बच्चन 99 वे तर करण जोहर 97वे आहेत. आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण देखील या यादीत झळकत आहेत.

बुवा अथवा महाराजांच्या बाबत केवळ रामदेव आणि सदगुरु यांनाच स्थान मिळालेले आहे. उद्योगपती आणि यशस्वी उद्योजक यापैकी टाटा समूहाचे एन चंद्रशेखरन, तसेच महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बजाजचे राजीव बजाज, कोटकचे उदय कोटक, विप्रोचे अझीम प्रेमजी यांचा या यादीत समावेश आहे. इन्फोसिसचे नंदन निलकेणी देखील या यादीत आहेत आणि ‘फोन पे’ चे संस्थापक समीर निगम यांचा या यादीत पहिल्यांदाच समावेश झालेला आहे. क्रीडाक्षेत्रात नीरज चोप्रा, विराट कोहली, एम एस धोनी तसेच महिला पैलवानावरील अन्यायाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विनेश फोगट यांचा या यादीत समावेश आहे.

यातील राजकीय मंडळी खरोखरच किती शक्तिशाली आहेत याची कसोटी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत लागणार आहे. कोण पहिलवान आणि कोण काडी पहिलवान हे लवकरच दिसणार आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.