कोल्हापुरात देशातले पहिले भरतकाम संग्रहालय
धागा धागा जुळवत बनल्या असंख्य भरत काम कलाकृती : पाचगाव येथे पाहण्यास खुले
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
धाग्याला धागा जुळत गेला की त्याला एक आकार येतो. या आकाराला दिशा देत गेले की त्याची आकृती बनते. आणि या आकृतीतून एक चित्रकृती जन्म घेते. अस एकेक धागा जोडून, एकेक टाका घालून तयार झालेल्या भरतकाम चित्रकृतीचे देशातील पहिले संग्रहालय कोल्हापुरात साकारले आहे. कलापूर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या कला वैशिष्ट्यात या भरतकाम दालनाने आणखी एक वेगळी भर घातली आहे.
एकेक धागा हे म्हणायला सोपे आहे. फक्त हाताने एक एक धागा जोडत, टाका घालत साकारलेल्या त्या कलाकृती कोल्हापूरच्याच अस्मिता पोतदार यांच्या बोटातून वास्तवात उतरले आहे. नजर, हात, एकाग्रता आणि डोक्यात असलेला विषय याचा एकत्रित नजारा त्यांनी या कलाकृतीतून साकारला आहे. लोप पावत चाललेली ही भरतकामाची प्राचीन कला नव्या पिढीसमोर यावी यासाठी देशातील हे पहिले कलादालन उभारले आहे.
कोल्हापुरात पुरातन वस्तू संग्रहालय आहे. न्यू पॅलेस म्युझियम आहे. चंद्रकांत मांढरे आर्ट गॅलरी आहे. वि. स. खांडेकर भाषा भवन आहे. यात या भरतकाम दालनाची भर पडली आहे. फक्त भरतकामावरचे अशा पद्धतीचे कलादालन देशात फक्त कोल्हापुरातच आहे.
अस्मिता पोतदार यांनी गेली तीस वर्षे भरतकामाची कला जपली. इतर तरुणी, महिलांना ही कला यावी ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून त्या मोफत मार्गदर्शन करतात. कलेच्या प्रांतात ही आता आधुनिकता आली आहे. पण भरत कामातून कला साकारताना प्रत्येक टाका हातानेच घालावा लागतो. त्यात कोणतेही तांत्रिक सहाय्य उपलब्ध नाही त्यामुळे स्वत: मन एकाग्र करून ही कला जपावी लागते. पण कलाकृती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ती खूप जिवंत भासते.
या कलासंग्रहालयात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकृतीसह अन्य कलाकृती आहेत. विशेषत: देशातील विविध प्रांतात असलेल्या वस्त्रपरंपरेवर सांस्कृतिक शैलीवर आधारित या कलाकृती आहेत. ‘जतन’ असे या कलासंग्रहालयाचे नाव आहे. जतन वास्तू प्लॉट नंबर सात, गुलाब नगर पाचगाव रस्ता येथे हे कलासंग्रहालय अकरा ते पाच यावेळेस सर्वांना पाहण्यास खुले आहे.
एकेक टाका घालत भरत काम पूर्ण करावे लागते. 30-40 वर्षांपूर्वी सर्व मुलींच्या शाळेत भरतकामासाठी एक तास दिला जात होता. भरतकाम ही देशातील जुनी शैली आहे. पण अलीकडे आधुनिकतेमुळे या कला काळाच्या आड दडल्या जात आहेत. कोल्हापूर हे कलेचे माहेरघर आहे. त्यामुळे तेथेही कला जतन केली आहे. आणि त्यामुळेच देशातले हे पहिले दालन येथे उभे राहिले आहे.
-अस्मिता पोतदार