For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशातील पहिले एआय विद्यापीठ बेंगळुरात

06:03 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
देशातील पहिले एआय विद्यापीठ बेंगळुरात
Advertisement

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची घोषणा : ‘गुगल आयओ कनेक्ट’ कार्यक्रम

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेंगळूर येथे भारतातील पहिले सरकारी प्रायोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ’ (एआय युनिव्हर्सिटी) स्थापनेची घोषणा केली आहे. मंगळवारी बेंगळूरमध्ये ‘गुगल आयओ कनेक्ट’ कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. एआय युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकातील विद्यार्थ्यांना एआय प्रशिक्षण व अध्ययनाच्या संधींचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने बाळगले आहे.

बेंगळूरमधील आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, कर्नाटकाला ‘एआय-नेटिव्ह’ राज्य बनण्यास आणि प्रशासन-सार्वजनिक सेवा पुरविण्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास राज्य सरकार सज्ज आहे. एआय प्रतिभा विकसित करणे, प्रगत संशोधनाला प्रोत्साहन देणे तसेच शैक्षणिक संस्था, उद्योग व सरकार यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी एआय विद्यापीठाची स्थापना केली जाईल. स्टार्टअप्स आणि उद्योगांच्या संशोधन व विकासासाठी एक इन्क्युबेशन सेंटर म्हणून बेंगळुरात विशेष ‘एआय हब’ स्थापन केले जाईल.

लहान व्यवसायांमध्ये परिवर्तन घडविणार

‘एआय’च्या माध्यमातून अध्यापनाद्वारे शिक्षण क्षेत्रात, रोगांचे लवकर निदान आणि उत्तम वैद्यकीय साहाय्याद्वारे आरोग्य क्षेत्रात, शेतकऱ्यांसाठी एआयचलित सक्षम सल्लागार सेवांद्वारे कृषी क्षेत्रात, जलद आणि जनस्नेही सेवा वितरणात सरकारी सेवांमध्ये आमुलाग्र बदल घडविला जाईल. त्याचप्रामणे एआय साधनांचा वापर करून स्पर्धा वाढवून लहान व्यवसायांमध्ये परिवर्तन घडवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

मानवी क्षमतांमध्ये परिवर्तनाची ग्वाही

वाफेच्या इंजिनने औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवली. विजेने शहरांमध्ये परिवर्तन घडवले. इंटरनेटने संवादाचे माध्यम बदलले. मोबाईल तंत्रज्ञानाने सर्व काही सहज उपलब्ध केले. आज, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मानवी क्षमतांमध्येच परिवर्तन घडवण्याचे ग्वाही देत आहे. आपले राज्य अशा भविष्याला आकार देणाऱ्या प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. बेंगळूरमध्ये तंत्रज्ञान केवळ कार्यालयांपुरते मर्यादित नाही. कॉफी शॉप, वर्गखोल्या आणि संशोधन प्रयोगशाळांमध्ये त्यांची सुरुवात झाली. त्यानंतर त्याला स्टार्टअपचे रूप प्राप्त झाले. हाच बेंगळूरचा आणि कर्नाटकाचा विचार आहे, असे ते म्हणाले.

बेंगळूर ही भारताची स्टार्टअप राजधानी आहे. हजारो जागतिक उत्कृष्टता केंद्रांनी संपूर्ण जगासाठी उत्पादने डिझाइन, इंजिनिअर आणि नवनवीन शोध लावण्यासाठी कर्नाटकची निवड केली आहे. या प्रवासात गूगल एक भागीदार ठरले आहे. गेल्या दोन दशकांपासून, गुगलने बेंगळूरची निवड केवळ कार्यालयाचे ठिकाण म्हणून नव्हे, तर अभियांत्रिकी, संशोधन आणि नवोन्मेषासाठीच्या आपल्या सर्वात महत्त्वाच्या जागतिक केंद्रांपैकी एक म्हणून केली आहे.

आम्हाला गुगलसोबतचे हे संबंध पुढील स्तरावर घेऊन जायचे आहेत. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बेंगळूर शहरातील वाहतुकीची समस्या सोडविता येईल. 25 वर्षांपूर्वी बेंगळूरची लोकसंख्या 70 लाख होती. आता ती 1.40 कोटी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली असून त्यावर मात करण्यासाठी आम्ही उपाय शोधत आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारचे ध्येय....

गेल्या दोन दशकांपासून बेंगळूरमध्ये गूगलने दिलेल्या योगदानाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. तसेच त्यांनी गूगलला शिक्षण, आरोग्य, कृषी आणि लघु उद्योगांसाठी उपयुक्त एआय साधने विकसित करण्याचे आवाहन केले. कर्नाटकाला सुरक्षित, विश्वसनीय आणि जबाबदार तंत्रज्ञानासाठी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा बनविण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.