जानेवारीमधील जीएसटी 1.72 लाख कोटी रुपये
प्राथमिक महसूल आकडेवारी जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जानेवारी 2024 मध्ये एकत्रित जीएसटी महसूल 1 लाख 72 हजार 129 कोटी रुपये इतका जमा झाला आहे. हा महसूल जानेवारी 2023 मध्ये जमा झालेल्या 1 लाख 55 हजार 922 कोटींच्या तुलनेत 10.4 टक्के अधिक असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून बुधवारी रात्री देण्यात आली. हे आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च मासिक संकलन असून या आर्थिक वर्षात 1.70 लाख कोटी किंवा त्याहून अधिक संकलनासह तिसरा महिना आहे. जानेवारी महिन्यामध्ये सीजीएसटी संकलनातून 43,552 कोटी रुपये आणि 37,257 कोटी एसजीएसटीपोटी जमा झाले आहेत. गुरुवारी देशाचा अर्थसंकल्प जाहीर होणार असल्याने बुधवारी संध्याकाळी जीएसटीची प्राथमिक आकडेवारी जाहीर करण्यात आली. अंतिम आकडेवारी गुरुवारीच जाहीर होणार असून जानेवारी महिन्याचे अंतिम संकलन सध्याच्या अंदाजापेक्षा अधिक नोंद होणार आहे.