राष्ट्रपती निवडणुकीची आज मतमोजणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंधराव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी गुरुवारी होत असून दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. देशातील विविध राज्यांतून मतपेटय़ा दिल्लीत दाखल झाल्या आहेत. 21 जुलै रोजी सकाळी मतमोजणी होणार आहे. यानंतर दुपरापर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो. राष्ट्रपती निवडणुकीसाठी 99 टक्केपेक्षा जास्त मतदान झाले आहे. त्यातच काही राज्यांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या पारडय़ात अपेक्षेपेक्षा जास्त मते पडण्याची शक्यता आहे. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा युपीएच्या बाजूने रिंगणात असून त्यांना 14 पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. तर, मुर्मू यांना 27 हून अधिक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.