झारखंड विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी
पोटनिवडणुकांच्या निकालाकडेही देशवासियांचे लक्ष
वृत्तसंस्था/ रांची
महाराष्ट्रासोबतच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागणार आहेत. 81 जागांच्या झारखंड विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. राज्यात एकूण 1,166 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. याशिवाय, वायनाड आणि नांदेड या लोकसभेच्या दोन जागांसह विधानसभा पोटनिवडणूक झालेल्या 47 जागांवरील मतमोजणीही शनिवारी होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 9 जागांचा समावेश आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वातील सरकार सत्ता टिकवते की गमावते? तसेच केरळमधील ‘वायनाड’च्या लोकसभा पोटनिवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो? याकडे देशवासियांचे लक्ष लागलेले आहे.
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात एकूण 638 तर दुसऱ्या टप्प्यात 528 उमेदवार रिंगणात होते. 13 नोव्हेंबरला निवडणूक झालेल्या पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी 66 टक्के मतदारांनी मतदान केले होते. तर दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 38 जागांवर 68 टक्के मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 67.04 टक्के मतदानाच्या तुलनेत यावेळी राज्यात किंचित जास्त मतदान झाले.
झारखंडमध्ये मुख्य लढत एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये आहे. ‘एनडीए’मध्ये भाजप, आजसू, जेडीयू आणि लोजपा-पासवान गट यांचा समावेश आहे. तर ‘इंडिया’मध्ये झामुमो, काँग्रेस, राजद आणि सीपीआय-एमएल यांचा समावेश आहे. एनडीए आघाडीत सहभागी पक्षांमध्ये 68, 10, 2 आणि 1 याप्रमाणे सूत्र ठरले होते. याअंतर्गत भाजपने सर्वाधिक 68 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. इंडिया अलायन्समध्ये जेएमएमकडून 43, काँग्रेसकडून 30, आरजेडीकडून 6 आणि सीपीआय-एमएलकडून 4 उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीवर
झारखंडमधील मतदानोत्तर चाचण्यांमध्ये एनडीएचे सरकार सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मेट्रिसच्या एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 42-47 जागा मिळू शकतात, तर सत्ताधारी जेएमएम-काँग्रेस-आरजेडी महाआघाडीला 25-30 जागांवर समाधान मानावे लागेल. ‘पीपल्स पल्स’च्या एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये एनडीएला 44-53 जागा आणि इंडिया अलायन्सला 25-37 जागा मिळू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.