For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहनांचा दंड भरण्यासाठी तीन ठिकाणी काऊंटर

12:36 PM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
वाहनांचा दंड भरण्यासाठी तीन ठिकाणी काऊंटर
Advertisement

शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी विस्कळीत : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Advertisement

बेळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक नियमन कक्ष (टीएमसी) मधून पोस्टाद्वारे दंडाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. मात्र बहुतांशजण दंडाची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने दंडाच्या रकमेत 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून न्यायालय आवार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दंड भरून घेण्यासाठी काऊंटर सुरू करण्यात आले आहेत.

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पण त्याला अद्यापही म्हणावे तसे यश आलेले नाही. वन वे मधून दुहेरी वाहतूक सुरू असली तरी पोलिसांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तसेच पार्किंग व्यवस्थेचे तीनतेरा उडाले आहे. वाहनचालक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करीत आहेत. यापूर्वी नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी केल्यास टोईंग वाहनाद्वारे वाहने उचलून थेट पोलिसस्थानकात नेली जात होती. या कारवाईच्या धास्तीने काही प्रमाणात मध्यंतरी वाहतुकीला शिस्त लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. पण, आता वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

Advertisement

पुन्हा आड वळणावर वाहन चालकांची अडवणुकीचे प्रकार 

वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांची तपासणीच्या नावाखाली अडवणूक करू नये, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना टीएमसीमधून नोटिसा पाठवाव्यात, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. मात्र पोलीस आयुक्तांच्या सूचनेला पोलिसांकडूनच वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. या ना त्या कारणावरून वाहनचालकांकडून पैसे वसूल करणे अचानक बंद झाल्याने वाहतूक पोलीस काही दिवसापासून अस्वस्थ बनले आहेत. त्यामुळेच पुन्हा आड वळणावर थांबून वाहन चालकांची अडवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

पोलिसांच्या तुघलकी कारभाराबाबत तीव्र संताप

पोलिसांच्या या तुघलकी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास न्यायालयात 10 हजार रुपये दंड भरावा लागतो. शहरातील काही मद्य दुकानांच्या परिसरात वाहतूक पोलीस लक्ष ठेवून आहेत. मद्य प्राशन करून बाहेर पडलेल्या वाहन चालकांचा पाठलाग करून त्यांना पोलीस स्थानक आवारात नेले जात आहे. दंडात्मक कारवाईची भीती दाखवून संबंधितांकडून तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत पैसे वसूल करून त्यांना परस्पर सोडून दिले जात असल्याची चर्चा आहे. पण या सर्व गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे.

50 टक्के दंड भरण्यासाठी 12 डिसेंबरपर्यंत मुदत 

टीएमसीमधून नोटिसा पाठवून देखील अनेकजणांनी दंडाची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा दंड थकला आहे. थकीत दंड वसूल व्हावा, यासाठी सरकारने 50 टक्के सवलत दिली आहे. नागरिकांना दंडाची रक्कम भरणे सोयीस्कर व्हावी, यासाठी नुकतेच न्यायालय आवार, जिल्हाधिकारी कार्यालय आवार आणि मध्यवर्ती बसस्थानक आवारात काऊंटरची सुरुवात करण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून, दंड भरल्यानंतर ऑनलाईन रिसीट दिली जात आहे. याचबरोबर शहर व परिसरात आठ ते दहा ठिकाणी अशा प्रकारचे काऊंटर सुरू केले जाणार आहेत. 50 टक्के दंड भरण्यासाठी 21 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.