उत्कृष्ठ ‘करिअर’ साठी समुपदेशन गरजेचे
महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी बारावीच्या शिकवणी वर्गाच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी आपल्या मुलीला बेदम मारहाण केली आणि त्यात त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सर्वांनाच सुन्न करून गेली. तसेच एका सुशिक्षित कुटुंबातील सर्वांनीच 98 टक्के गुण मिळवलेल्या मुलाला 99 टक्के गुण का मिळाले नाहीत म्हणून खूप अपमान केला म्हणून त्या मुलाने नैराश्याने आपले जीवन संपवले. पालक आणि विद्यार्थी यावेळी खूपच तणावात दिसून येतात. उत्कृष्ठ करिअरसाठी नेमके काय ठरवायला हवे, याबाबत खूपच संभ्रम आढळून येतो. अशावेळी योग्य दिशादर्शन खूपच महत्त्वाची कामगिरी बजावू शकते. करिअर म्हणजे नेमके काय? त्याची उद्दिष्ठे काय असावीत आणि आपली आवड व करियर याचा योग्य मेळ कसा घालायचा, याचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही खूपच मोलाचे ठरू शकते. पालकांचे सर्वप्रथम प्रबोधन करणे गरजेचे आहे कारण पालकच अपुऱ्या माहितीवर निर्णय घेत असतात आणि आपल्याला आयुष्यात जे जमले नाही ते आपल्या मुलांनी करावे, यासाठी मुलांना त्यांना न आवडणाऱ्या अभ्यासक्रमांना जुंपताना दिसतात. पालकांना आधी शहाणे करण्यात आले तर मुलांच्या करियरचे अर्धेअधिक प्रश्न सुटून जातील. बारावी संपल्यानंतरचा टप्पा हा करिअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत निर्णायक असतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे पुढील दिशा ठरवण्यासंदर्भातील निर्णयसुद्धा योग्यच असायला हवा. पण बहुसंख्य विद्यार्थ्यांना अजूनही योग्य दिशा ठरवण्यात अडचण येते. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, पर्याय समजून घ्या आणि नंतर विचारपूर्वक पाऊल उचला. आज जग हे संधींनी भरलेलं आहे फक्त त्यात योग्य ती दिशा निवडणं आपल्यावर अवलंबून आहे. दहावी आणि बारावीनंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. आज, विद्यार्थ्यांना अनेक पर्याय आणि अभ्यासक्रमांचा सामना करावा लागतो आहे. आज उपलब्ध असलेल्या कितीतरी कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्याची प्रक्रिया खूप कठीण झाली आहे. बारावी विज्ञान शाखा घेऊन नंतर ज्यांना इंजिनियर व्हायचे आहे त्यांना नेमके कुठे जायचे हे ठरवण्यात असंख्य अडचणींचा समान करावा लागतो आहे. अशावेळी तज्ञ समुपदेशक यांची मदत घेऊन आपले पुढील ध्येय विध्यार्थ्यांनी निश्चित करणे अधिक श्रेयस्कर ठरेल.
केम्ब्रिज इंटरनॅशनल ग्लोबल एजुकेशनने केलेल्या पाहणीत भारतात तब्बल 62 टक्के विद्यार्थी कोचिंग क्लासला जातात. अगदी बालवाडीपासून मुलांना क्लासला जुंपले जाते. दहावी आणि बारावी म्हणजे ‘जीवनाची लढाई’ असे स्वरूप प्राप्त झाल्याने समस्त विद्यार्थी वर्ग अगदी मनोभावे कोचिंग क्लासला प्रदक्षिणा घालत असतो. यामुळे ज्युनिअर कॉलेजेस फत्त कागदावरच दिसून येतात. मेडिकलसाठी ‘नीट’ परीक्षा आणि ‘आयआयटी’ साठी ‘जेईई मेन आणि जेईई’ अॅडवान्सड्साठी कोचिंग देणाऱ्या संस्थांची वार्षिक उलाढाल तब्बल पन्नास हजार कोटीच्या पुढे गेली आहे. 2028 पर्यंत ही उलाढाल 1 लाख 34 हजार कोटींच्यावर जाईल असा अंदाज आहे. लातूरमध्ये ‘लातूर पॅटर्न’ ची ‘नीट’ ची वार्षिक उलाढाल आता एक हजार कोटीवर पोहचली आहे. भारतात ‘कोटा पॅटर्न’ ही प्रसिद्ध झाला आहे. येथील वार्षिक उलाढाल चार हजार कोटीपर्यंत पोहचली आहे. कोटा हे शहर देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे राजधानी शहर झाले आहे. यावरून चोवीस तास कोचिंग मुळे विद्यार्थी मानसिक संतुलन हरवून बसत आहेत, हे देशाच्या लक्षात आले. कोटा येथे दरवर्षी कोचिंगसाठी देशभरातून 3 लाख विद्यार्थी पोहचत असतात. आक्षेप कोचिंगला नाही तर यातील वाढत्या बाजारीकरणाला आहे. यामधून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल होताना दिसते आहे.
समस्त पालक वर्ग मुलांच्या करिअरविषयक चिंतेने ग्रासलेला दिसून येतो आहे. अशावेळी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन मुलांना करिअर निवडू द्यावे असे सुचवावेसे वाटते. कारण अलीकडेच आयआयटीमध्ये अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ‘आयआयटी जेईई अॅडव्हान्स’ पास झालो ही माझी सगळ्यात मोठी चूक होती, हे माझे क्षेत्र नाही आणि मला यामध्ये कोणताच आनंद मिळत नाही, हे त्याचे चिट्ठीतील वाक्य सर्वांनाच अस्वस्थ करायला लावणारे आहे. करिअरसाठी मुलांमध्ये स्वत:द्दल सर्वप्रथम ‘आत्मभान’ आणण्याची गरज आहे. करिअरचे नियोजन करताना दीर्घ पल्ल्याचा विचार करणे आवश्यक आहे. याशिवाय मुलांची आवड तसेच प्रेरणा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू लक्षात घेणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास आणि यशस्वी होण्यासाठी सातत्याने कष्ट करण्याची मानसिकता व विविध प्रकारच्या लोकांबरोबर काम करण्याची तयारी हे आवश्यक गुण आहेत. तज्ञांकडून ‘पर्सनॅलिटी बॅलन्स शीट’ तयार करून घेतली की मग बलस्थाने काय आहेत आणि कमतरता नेमकी काय आहे, याचा नेमका आढावा घेणे शक्य होऊन याआधारे योग्य निर्णय घेता येईल. आज प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विचार न करताच पालक ठरवतात तेथे विद्यार्थी निमूटपणे शिकताना दिसतो. अभियांत्रिकी वा वैद्यकीय मागे धावणे यालाच करिअर म्हटले जाऊ लागले आहे. करिअर म्हणजे काय आणि त्याचा नेमका उद्देश काय ह्याचा मागमुसही ह्या निर्णयात नसतो. करिअर हा एक दीर्घकालीन प्रयत्न आहे, ज्यासाठी आपण दररोज तयारी आणि प्रयत्न करतो. करिअरमध्ये भूमिका, शिक्षण, अनुभव आणि आपली उद्दिष्टे गाठण्यासाठी आपण घेतलेले मार्ग/निवडलेले पर्याय यासारख्या विविध घटकांचा समावेश असतो. करियर म्हणजे आपण मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या किती विकास साधतो हे देखील असते. कारण रोजच्या जडणघडणीत ही गोष्ट देखील सोपी नाहीये. म्हणूनच वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या विकासदेखील महत्त्वाचा असतो. तुमचे करिअर तुमच्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे.
-प्रा. डॉ. गिरीश नाईक