For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोस्टा रिका-ब्राझील सामना बरोबरीत

06:41 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोस्टा रिका ब्राझील सामना बरोबरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ इंग्लेवुड (अमेरिका)

Advertisement

2024 च्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या सलामीच्या सामन्यात कोस्टा रिकाने बलाढ्या ब्राझीलला गोलशून्य बरोबरीत रोखले. या सामन्यात कोस्टा रिकाच्या भक्कम बचावफळीला ब्राझीलकडून छेद देता आला नाही.

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये या दोन संघात 20 सामने झाले असून त्यापैकी 18 सामने ब्राझीलने तर 2 सामने कोस्टा रिकाने जिंकले आहेत. कोस्टा रिकाचा गोलरक्षक पॅट्रिक सिक्वेराने ब्राझीलचे तीन अचूक फटके अडविले. सामन्याच्या पूर्वार्धात ब्राझीलच्या मारक्यून्होसने नोंदविलेले गोल पंचांनी ऑफ साईड  ठरविल्याने त्यांची निराशा झाली. या सामन्याला सुमारे 68 हजार शौकिन उपस्थित होते. ड गटातील हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने आता या गटात कोलंबिया संघ आघाडीवर आहे. कोलंबियाने आपल्या पहिल्या सामन्यात पराग्वेचा 2-1 असा पराभव केला. बलाढ्या ब्राझीलने आतापर्यंत 9 वेळेला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. यावेळी ब्राझील संघाचे नेतृत्व रियल माद्रीद क्लबकडून खेळणाऱ्या व्हिनिसियस ज्युनिअरकडे सोपविण्यात आले आहे. ब्राझील संघातील रॉड्रीगोने सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत शानदार चाली रचत कोस्टा रिकाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. पण कोस्टा रिकाच्या बचावफळीने तसेच गोलरक्षकाने ब्राझीलच्या या चढाया फोल ठरविल्या. कोस्टा रिकाला अर्जेंटिनाने गस्टेव्ह अल्फारो यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. या सामन्यात पूर्वार्धात ब्राझीलने 75 टक्के चेंडूवर आपले नियंत्रण ठेवले होते. 22 व्या मिनिटाला व्हिनिसियसने मारलेला फटका कोस्टारिकाच्या गोलपोस्टच्या बाहेरुन गेला. त्यानंतर 30 व्या मिनिटाला रॉड्रीगोने हेडरद्वारे मारलेला फटका गोलपोस्टच्या वरुन गेल्याने ब्राझीलला खाते उघडता आले नाही. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात कोस्टा रिकाने आपल्या डावपेचात बदल करत काही आक्रमक चाली केल्या. 86 व्या मिनिटाला ब्राझील आपले खाते उघडण्याच्या उंबरठ्यावर असताना कोस्टा रिकाच्या मध्यफळीतील खेळाडूंनी ब्राझीलचे हे आक्रमण थोपविले. अखेर हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने ब्राझीलचे समर्थक निराश झाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.